ST Workers Strike : एसटी संपामुळे वारकऱ्यांना कार्तिकी यात्रेची वाट खडतर, रेल्वेने सोडल्या दोन जादा गाड्या
Kartiki Ekadashi : गोरगरीब सर्वसामान्य भाविकांची जीवनवाहिनी असलेली लालपरीला ब्रेक लागल्याने यात्रेला कसे जायचे असा प्रश्न वारकरी संप्रदायासमोर उभा ठाकला आहे.
पंढरपूर : गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे सहा यात्रा रद्द झाल्या असताना यंदा ठाकरे सरकारने वारकरी संप्रदायाला खुशखबर देत कार्तिकी यात्रा भरविण्याचा निर्णय घेतला. मात्र यंदा वारकऱ्यांना एसटीच्या संपाचा फटका बसणार असल्याचं चित्र आहे. गोरगरीब सर्वसामान्य भाविकांची जीवनवाहिनी असलेली लालपरीला ब्रेक लागल्याने यात्रेला कसे जायचे असा प्रश्न वारकरी संप्रदायासमोर उभा ठाकला आहे. या यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने दोन नांदेडमधून दोन जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागण्यासाठी आक्रमक झाल्याने गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातून सुरु असलेली बस वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. दरवर्षी कार्तिकी राज्यभरातून यात्रेला साधारण तीन हजार जादा एसटी बसेस भाविकांसाठी सोडण्यात येत असतात. उद्याच्या 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा असताना गोरगरीब भाविकांना पंढरपूरला येण्यासाठी खाजगी वाहनांशिवाय कोणताच पर्याय नाही. तसे रेल्वे प्रशासनांत कार्तिकी यात्रेसाठी नांदेड येथून दोन रेल्वे जादाच्या सोडल्या असल्या तरी आठवड्यात केवळ सहा रेल्वे सध्या येत असल्याने वारकऱ्यांना लाडक्या विठुरायाकडे यात्रेला कसे पोचायचं हा मोठा प्रश्न आहे.
खाजगी गाड्यांची भांडी डबल झाली असताना गोरगरीब वारकऱ्याला यंदाही घरी बसूनच कार्तिकी यात्रा करावी लागणार अशी परिस्थिती आहे. एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांचा रोष असताना यंदा जर वारकऱ्यांसाठी पंढरपूरला येण्याची पर्यायी व्यवस्था न झाल्यास वारकरी संप्रदायाचा रोषही सरकारला सोसावा लागणार आहे.
वारकरी संप्रदायाला आषाढी, कार्तिकी हा दिवाळी सणाएवढाच महत्वाचा असतो. राज्यभरातून हजारो भाविक या यात्रेसाठी पंढरपूरला येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे वारकरी संप्रदायाच्या यात्रा काळात पंढरपूरमध्ये संचारबंदी लावण्याची वेळ शासनावर आली होती. आता कोरोनाचे संकट कमी झाले असून लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा 15 नोव्हेंबर रोजी होणार कार्तिकी यात्रेचा सोहळा कोरोनाचे नियम पाळून व्हावा या वारकरी संप्रदायाच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे संकेत मिळाल्याने आता प्रशासन देखील तयारीला लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
- सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही, पडळकरांसह भाजप नेत्यांचा निर्धार
- Kartiki Ekadashi : यंदाची कार्तिकी यात्रा विक्रमी होणार, 6 ते 24 नोव्हेंबरपर्यंत चोवीस तास मुखदर्शन; मंदिर समिती बैठकीत निर्णय