Kartiki Ekadashi : यंदाची कार्तिकी यात्रा विक्रमी होणार, 6 ते 24 नोव्हेंबरपर्यंत चोवीस तास मुखदर्शन; मंदिर समिती बैठकीत निर्णय
Kartiki Ekadashi 2021 : कार्तिकी यात्रेसाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे मात्र भाविकांसाठी लसीकरणाची अट नसेल असा निर्णय मंदिर समिती बैठकीत घेण्यात आला आहे.
पंढरपूर : गेल्या 18 महिन्यांपासून वारकरी संप्रदायाच्या तब्बल सहा महत्वाच्या यात्रा कोरोनामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये काहीशी नाराजी होती. यंदाची कार्तिकी यात्रा होण्याचे संकेत राज्य सरकारने दिल्यानंतर आता मंदिर प्रशासन कामाला लागलं आहे. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रा घ्यावी असा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. या यात्रेसाठी 6 नोव्हेंबर रोजी देवाचा पलंग निघणार असून 6 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
यात्रेला येणाऱ्या भाविकांना लसीकरणाची कोणतीही अट न घालण्याचा निर्णय बैठकीत झाला असून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मात्र पाळले जाणार आहेत. मंदिर समितीचा हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे पाठवला जाणार असून यानंतर शासन यात्रेबाबत अंतिम निर्णय जाहीर करेल. दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून यात्रा न झाल्याने यंदा कार्तिकीला 8 ते 10 लाख वारकरी येणे अपेक्षित असून त्यादृष्टीने मंदिर प्रशासनाने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत .
यंदा 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा असून शासनाकडून यंदा कार्तिकी यात्रा भरविण्याचे संकेत मिळाल्याने प्रशासनाने यात्रा होणार असे गृहीत धरून आधीच तयारीला सुरुवात केली होती.
वारकरी संप्रदायाला आषाढी, कार्तिकी हा दिवाळी सणाएवढाच महत्वाचा असतो. राज्यभरातून हजारो भाविक या यात्रेसाठी पंढरपूरला येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे वारकरी संप्रदायाच्या यात्रा काळात पंढरपूरमध्ये संचारबंदी लावण्याची वेळ शासनावर आली होती. आता कोरोनाचे संकट कमी झाले असून लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा 15 नोव्हेंबर रोजी होणार कार्तिकी यात्रेचा सोहळा कोरोनाचे नियम पाळून व्हावा या वारकरी संप्रदायाच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे संकेत मिळाल्याने आता प्रशासन देखील तयारीला लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- विठ्ठल भक्तांसाठी खूशखबर, नमामि चंद्रभागा प्रकल्पाला सुरुवात
- तब्बल 12 वर्षानंतर कार्तिकीच्या घोडेबाजारात दर्जेदार अश्व दाखल; प्रशासनाच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष
- पालखी मार्गाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला, 8 नोव्हेंबरला पंतप्रधानच्या हस्ते होणार शुभारंभ