लालपरी सुस्साट! सरकारी योजनांच्या टेकूने एसटी फायद्यात, ऑगस्ट महिन्यात कमावला इतक्या कोटींचा नफा
जुलै महिन्यात एसटी महामंडळाला 18 कोटींचा तोटा झाला होता. ऑगस्ट महिन्यात कोणतेही मोठे सणवार नसूनही एसटी महामंडळानं तोटा कमी करत 16 कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे.
मुंबई : विविध सरकारी योजनांचा आधार घेत गेली अनेक वर्षे तोट्यात असलेली एसटी (ST Bus) आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. 'गाव तेथे एसटी' असं ब्रीद कायम ठेवताना आर्थिक अडचणींना देखील एसटी महामंडळाला सामोरे जावे लागत होते. मात्र एसटी महामंडळ ऑगस्ट महिन्यात 16 कोटी 86 लाख 61 हजारांनी फायद्यात ले आहे. जुलै महिन्यात एसटी महामंडळाला 18 कोटींचा तोटा झाला होता. ऑगस्ट महिन्यात कोणतेही मोठे सणवार नसूनही एसटी महामंडळानं तोटा कमी करत 16 कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे.
दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. या आधी 2015 साली एसटी महामंडळ फायद्यात आलं होतं.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळा एबीपी माझानं ऑगस्ट महिन्यातच बाहेर काढला
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळा एबीपी माझानं ऑगस्ट महिन्यातच बाहेर काढला होता, यावेळी अनेक वाहकांनी मान्य केलं होतं की, 75 वर्ष वयाच्या नागरिकांची अतिरिक्त तिकीटं मारली जात आहेत. एसटी महामंडळाकडून देखील घोटाळा झाल्याचं मान्य करत काही बड्या अधिकाऱ्यांची बदली देखील केली होती. अशात, इतका मोठा तोटा कमी करत एसटी महामंडळ फायद्यात येत असल्यानं सांगण्यात येत असलं तरी नेमकी फायद्यात येण्याची कोणती कारण आहेत, हे बघणं महत्त्वाचे असणार आहे.
एसटीने अनेक अभिनव उपक्रम
याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात " हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान", विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या.