MSRTC Electric Bus : महामंडळाला इलेक्ट्रिक बसेसची वर्षभरापासून प्रतिक्षा; जुन्या बसेसमधील तांत्रिक बिघाडामुळे डोकेदुखी
नागपूर विभागातील 400 बसेस पैकी बहुतांश बसेस जुन्या झाल्या आहेत. काही बसचे तर पत्रे बाहेर आल्याने अपघाताची भीती असते. बसेसच्या वायरिंग जळण्याच्याही घटना घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
Nagpur News : एसटी महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) वर्षाच्या सुरुवातीला शहरासह विदर्भातील सर्व प्रमुख आगारांना इलेक्ट्रिक बसेस (Electric Buses) देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र वर्ष उलटून गेले तरी नागपूर विभागाला एकही इलेक्ट्रिक बस उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एसटीच्या मोडकळीस आलेल्या भंगार बस चालवण्याचा कंटाळा आल्याने एसटी कर्मचारीही नाराजी व्यक्त करताना दिसून येतात. एसटी बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने नव्या बसेसची प्रतिक्षा नागपूर विभागाला आहे.
प्रवाशांचा जीव धोक्यात
एसटीच्या नागपूर विभागात (Maharashtra State Road Transport Corporation Nagpur Dicision) सुमारे 400 बसेस धावतात. यातील काही बसेस जुन्या झाल्या असून त्यातून काळा धूर निघून प्रदूषण होते. तर काही बसचे पत्रे बाहेर आल्याने अपघाताची भीती असते. एसटी बसेसच्या वायरिंग जळण्याच्याही घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो. जुन्या एसटीचे इंजिन गरम झाल्याने केव्हाही वायरिंग पेट घेत असते. अनेकनवेळा बस रस्त्याच्या मधोमध बिघडते आणि ती दुरुस्त करण्यासाठी तासनतास लागतात. यानंतरही समस्या जैसे थे दिसून येते.
प्रतिक्षेतच गेला वर्ष
नवीन बसेसच्या प्रतिक्षेत एक वर्ष लोटून गेला आहे. स्थानिक एसटीचे अधिकाऱ्यांमध्ये आता नवीन वर्षात नवीन बसेसच्या आगमनाबद्दल चर्चेला ऊत आला आहे. एसटी महामंडळ सध्याच्या घडीला नफा मिळवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. कमी बसेस असताना प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.
अनेक मुद्द्यांवर मतभेद
एसटी व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेतील मतभेद प्रदीर्घ संपानंतरही कायम असल्याने एसटीच्या विकास कामावर परिणाम होत आहे. एसटी कर्मचारी नेते सातत्याने पगार आणि भत्ते वाढवण्याची मागणी करत आहेत. मात्र व्यवस्थापनाला ठोस उत्तर देता येत नाही. त्यामुळे या वर्षभरात दोघांमधील बाचाबाचीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेकवेळा पुन्हा संपाचा इशारा देण्यात आला होता. मात्र नंतर हे प्रकरण थंडावले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबितच
महाविकास आघाडी सरकार असताना विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात मोर्चा उघडला होता. सरकारविरोधात सुरु असलेल्या या आंदोलनाला विरोधकांकडूनही रसद पुरवण्यात येत असल्याचे आरोपही यावेळी झाले होते. तर विरोधकांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सरकारवर टीका करण्यात येत होती. तर एसटी कर्मचाऱ्यांचे देवदूत बनून अनेक जण पुढे आले होते. मात्र आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या की काय? की कर्मचाऱ्यांना आता त्या मागण्या पूर्ण करण्याची गरज नाही का असा सवाल सध्या विरोधात असलेल्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
ही बातमी देखील वाचा