(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीसंत गजानन महाराजांचा 141वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
या सोहळ्यासाठी हजारो पायी दिंड्या-पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत. शेगाव संस्थानच्या वतीने या सर्व दिंडी आणि पालख्यांसाठी विविध सुविधाही पुरवल्या जात आहेत. राज्यभरातून हजारो भाविक या प्रगक दिन सोहळ्यासाठी शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
बुलडाणा : विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे दरवर्षी श्रीसंत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा हजारो भाविक या सोहळ्यासाठी संतनगरी शेगाव दाखल झाले आहेत.
श्रीसंत गजानन महाराज हे 141 वर्षापूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते. त्याठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाव वासियांच्या सहवासात घालविले. दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता आणि येथेच ते समाधिस्त झाले. आज गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सकाळी 4 वाजल्यापासूनच भाविकांनी संतनगरी शेगाव मोठी गर्दी केली.
या सोहळ्यासाठी हजारो पायी दिंड्या-पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत. शेगाव संस्थानच्या वतीने या सर्व दिंडी आणि पालख्यांसाठी विविध सोई-सुविधाही पुरवल्या जात आहेत. राज्यभरातून हजारो भाविक या प्रगक दिन सोहळ्यासाठी शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
सोमवारी दुपारी 2 वाजता गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर रथ, गज, अश्वासह नगरपरिक्रमेला सुरुवात झाली. टाळ मृदुंगाच्या निनादात 'गण गण गणात बोते'चे नामस्मरण करत श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची पालखी निघाली. पुढे पताकाधारी सेवक त्यामागे वारकरी गजानन महाराजाचे नामस्मरण करत निघाले. शेगावमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन भक्तांच्या वतीने करण्यात आले.