Congress Agitation : सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न
नॅशनल हेरॉल्ड ( National Herald) प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. याविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.
![Congress Agitation : सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न Sonia Gandhi News Congress Protest across the country trying to block Gujarat Saurashtra Express Congress Agitation : सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/27/e60a2133451bb92ebfc3696e4a89d3af1658907434_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sonia Gandhi : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सलग दुसऱ्या दिवशी ईडीनं (ED) चौकशीसाठी बोलावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड ( National Herald) प्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. याविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. या विरोधात देशभर आंदोलन सुरु असतानाच मुंबईत युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. बोरिवली स्टेशनवर युवक काँग्रेसचे आंदोलन सुरु असून, गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान दिल्लीतही संसद भवन परिसरात काँग्रेसच्या खासदारांचे आंदोलन सुरु आहे.
कल्याण-डोंबीवलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
सोनिया गांधी यांच्या मागे ईडीची चौकशी लागल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. देशभरात काँग्रेसकडून आंदोलने सुरु आहेत. या पार्शवभूमीवर कल्याणमध्ये देखील कल्याण-डोंबीवली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन छेडण्यात आलं. कल्याणपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुड बुद्धीनं ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
नागपुरात ईडी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन, पोलिसांचा चोख बंदोबस्त
नागपुरमध्येही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने ईडी कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन सुरु केलं आहे. काल नागपुरात काँग्रेसच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक कार पेटवून दिली होती. त्यानंतर आज नागपूर पोलिसांनी इडी कार्यालयासमोर चोख सुरक्षा व्यवस्था लावली आहे. बॅरीकेटिंग करुन ईडी कार्यालय असलेल्या सिजीओ कॉम्प्लेक्स परिसरचे मुख्य दार बंद करण्यात आलं आहे.
महात्मा गांधींचे आवडते भजन म्हणत नागपुरात काँग्रेसचं आंदोलन
रघुपती राघव राजाराम सबको सन्मती दे भगवान हे महात्मा गांधी यांचे हे आवडते भजन म्हणत नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयावर पोहोचले आहेत. काँग्रेसच्या महिला कार्यकर्ताही या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. केंद्र सरकार आणि केंद्रीय एजन्सी जाणूनबुजून विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सोनिया गांधी यांना कितीही वेळा चौकशीसाठी बोलावलं तरी काँग्रेस कार्यकर्ते रोज आंदोलन करतील. आम्ही आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आम्ही आंदोलनाला घाबरणारे नाही असं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. या आंदोलनात माजी मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सहभागी झाले आहेत.
दिल्लीत देखील काँग्रेसच्या खासदारांनी आंदोलन केलं. दिल्लीच्या विजय चौकात काँग्रेसच्या खासदार एकत्र येत त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. पण राहुल गांधी मात्र ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. राहुल गांधींची 5 दिवसांत जवळपास 50 तासांसाठी चौकशी करण्यात आली होती. तेव्हा कांग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सलग 5 दिवस ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी होणार असून पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
National Herald Case : सोनिया गांधी यांची तब्बल सहा तास चौकशी, उद्या पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता
Rahul Gandhi Detained : दिल्लीत राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात काँग्रेसचं तीव्र आंदोलन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)