एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत 'श्री देव भैरी'
रत्नागिरी: रत्नागिरी शहराला आज काळाच्या ओघात नव रुप आलं असलं, तरी कोकणातील ग्रामदैवत इथल्या प्रत्येक रत्नागिरीकरांसाठी श्रध्दास्थान असतं. रत्नागिरीच श्री देव भैरी हे त्यापैकीच एक ग्रामदैवत.
समुद्र किनाऱ्यापासून अगदी अंगणा(सडया)पर्यंत पसरलेल्या रत्नागिरी शहराच्या श्री देव भैरी ग्रामदेवतेचं मंदिर हे कोकणातील इतर मंदिराप्रमाणे पहताक्षणीच मनात भरतं. कोकणातील शंकराच्या मंदिराप्रमाणे या मंदिराची रचना असून उतरत्या छपरावर, मातीची कौले आज ही मंदिराचं जुनंपण टिकवून आहेत.
मंदिराची ओळख
भैरी देवस्थानचा संपूर्ण परिसर झाडांनी वेढला आहे. मंदिराच्या दारातील पुरातन वड-पिंपळ वृक्षाचे विस्तारलेले बुंधेच मंदिराच्या पुरातनतेचे मूक साक्षीदार आहेत. मंदिराच्या आवारात पाण्याचे मोठे तलावही आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बांधणी असलेल्या पायऱ्या मंदिराच्या पाचशे वर्षांच्या इतिहासाचे दाखले देतात. या मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे रत्नागिरी शहराच्या 12 वाड्याच नाहीत, तर शहरात येणारा प्रत्येकजण इथे नतमस्तक होतो. सहाराचं भैरीबुवा बारवाड्यावर लक्ष ठेवून असतो आणि मदतीला धावतो अशी लोकांची ठाम श्रद्धा आहे.
मंदिराचा इतिहास
1731च्या सुमारास कान्होजी आंग्रेंचा मुलगा सेखोजी आरामारासह रत्नागिरीत आला. त्याच्याबरोबर पाच गुजर नामक कुटुंबे होती. यांनीच शहरात ही मंदिरे उभारली. त्याकाळी गावाचा कारभार पाहणाऱ्या सावंत-खोत मंडळींकडेच गावाचा आणि मंदिराचा सारा कारभार होता. 1976 पर्यंत या मंदिराचा कारभार सावंत-खोत मंडळींकडून चालवला जात असे. मात्र, 1967नंतर या मंदिरात पब्लिक ट्रस्ट स्थापन झाली आणि तेव्हापासूनच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा कारभार चालतो.
मंदिराचा मानपान
मंदिरात प्रवेश करताच आपल्याला दुरुनच श्री देव भैरीचे दर्शन होतं. या मंदिरातच तृणबिंदुकेश्वराचं मंदिर आहे. प्रथम तृणबिंदुकेश्वर आणि अन्य पाच मंदिरांचं दर्शन करुन मगच भैरीचं दर्शन घेण्याची इथे प्रथा आहे. भैरीच्या या मंदिरात पहाटेपासून अगदी रात्री उशीरापर्यंत रत्नागिरीकरांची गर्दी असते. रत्नागिरीकर सकाळी नोकरी व्यवसायावर जाण्यापूर्वी किंवा परतताना इथे माथा टेकून पुढे जातात. या ऐतिहासिक मंदिरातील प्रत्येकाचे मानपान वर्षानुवर्षांपासून जोपासलं जात असल्याचं मंदिर देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी सांगितलं.
सण उत्सवांचा जल्लोष
या मंदिरात वर्षभर विविध सण जल्लोषात साजरे होत असले, तरी शिमगोत्सवात, फाल्गुन शुक्ल पंचमीच्या रात्री मंदिराचा संपूर्ण परिसर रत्नागिरीकरांनी भरून गेलेला असतो. रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या वर्षातून एकदा वाजतगाजत श्री देव भैरीच्या भेटीला येतात. यासर्व पालख्यांची भेट भैरी मंदिराच्या आवारातील मिऱ्या गावात होते. भैरीच्या आवारात होणारी ही देवांची भेट अंगावर रोमांच आणणारी असते. भेटीनंतर भाविक पालख्या खांद्यावर घेऊन नाचवतात.
शिमगोत्सवावेळी पालखीतील विराजमान ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. इथूनच ग्रामदेवता ग्राम प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. पारंपरिक निशाण अबदागीर यांसह ही पालखी रात्रभर मानपानाप्रमाणे वाड्यावस्त्यांमध्ये फिरते.
बारा वाड्यातील 22 जाती जमातींची एकी
बारा वाड्यातील 22 जातीजमातींचे लोक हा उत्सव एकत्र येऊन साजरा करतात. शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे शिमगोत्सवातील होळीमध्ये अगदी मुस्लीम समाजाचा ही मान जपला जातो. फाल्गुन शुक्ल पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुरमाडाची मोठी होळी तोडली जाते. आपले मान-मरातब, पदे सारी विसरुन रत्नागिरीकर ही होळी आपल्या खांद्यावर घेऊन होळीच्या पारंपरिक स्थानावर घेऊन येतात. ग्रामदेवतेचा हा उत्सव कोकणी माणसाला एकीचं महत्त्व समजावून सांगतो. कसलंही ही मोठं आव्हान असलं, तरी एकत्र आलात- राहिलात तर यशस्वी व्हाल, हेच जणू हे ग्रामदैवत यातून पटवून देतात.
व्हिडिओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement