(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Babasaheb Purandare : शिवप्रेमी बाबासाहेबांच्या मनात राहिली 'ही' सल, माझा कट्ट्यावर व्यक्त केली होती खंत
Shivshahir Babasaheb Purandare passed away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. त्यांनी काही दिवसांपूर्वी माझा कट्ट्यावर बोलताना एक खंत व्यक्त केली होती.
Shivshahir Babasaheb Purandare passed away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काय होती बाबासाहेबांची खंत
बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना एक खंत व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात 352 किल्ले आहेत. समुद्र किनाऱ्यावर 65 किल्ले आहेत. माझ्याकडं अनेकदा लोकं येतात की अमक्या किल्ल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे. कितीतरी किल्ले असे आहेत ज्या किल्ल्यांवर काहीही राहिलेलं नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली होती. किल्ल्यांचं सवर्धन करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले होते. आपलं महाराजांविषयीचं प्रेम वरवरचं आहे. काही गोष्टी पाहिल्यानंतर काही वेळासाठी आपलं प्रेम उफाळून येतं. किल्ल्यांवर नाव लिहिण्यासारखे प्रकार लोकं करतात, असंही बाबासाहेब म्हणाले होते.
गडकिल्ल्यांबाबत शासनाची, राज्यकर्त्यांची अनास्था का आहे याबाबत त्यांना विचारलं असता बाबासाहेब म्हणाले होते की, ज्याला हौस नाही त्यानं लग्न करु नये अशी आपल्याकडं म्हण आहे. या म्हणीप्रमाणं माणूस हौशी पाहिजे, नवीन करण्याची हौस पाहीजे. शिवाजी महाराजांना ती हौस होती, त्यामुळं त्यांनी गडकिल्ले बांधले. आता ती हौस जागी करण्याचं काम आपल्या अभ्यासकांनी करायला हवं, असं ते म्हणाले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी जनमताचा रेटा असायला हवा आणि सोबतच या कामासाठी पैशांचीही व्यवस्था करायला हवी, असं ते म्हणाले होते.
Majha Katta : शिवचरित्राचा प्रवास कसा सुरु झाला? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितला प्रवास
एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं
बाबासाहेब या कार्यक्रमात म्हणाले होते की, मी 100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही, असं ते म्हणाले होते.
बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. 'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. 'सावित्री', 'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'राजा शिवछत्रपती', 'महाराज', 'शेलारखिंड', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'शनवारवाड्यातील शमादान', 'शिलंगणाचं सोनं', 'पुरंदरच्या बुरुजावरून', 'कलावंतिणीचा सज्जा', 'महाराजांची राजचिन्हे', 'पुरंदऱ्यांची नौबत' आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
Babasaheb Purandare Passed Away : एका युगाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन
बाबासाहेब पुरंदरेंबद्दल थोडक्यात
- पूर्ण नाव- बळवंत मोरेश्वर पुरंदरे तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
- पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी जन्म
- पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं
- 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारांहून अधिक व्याख्याने दिली
- महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा, मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तावेजांचा सखोल अभ्यास केला.
- जाणता राजा महानाट्याचे निर्माते, दिग्दर्शक
- वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखन
- राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, शेलारखिंड हे साहित्य प्रकाशित
- वयाच्या सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला.
- कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने लक्षावधी मैलांचा प्रवास
- 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2109 साली पद्मविभूषण पुरस्कार