शिवसेनेकडून राणेंवर 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रहार; ईडीच्या चौकशीला घाबरून राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोप
किरीट सोमय्या यांनी यापूर्वी नारायण राणेंच्या 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. तो जुना व्हिडीओ आता शिवसेनेने दाखवला आहे.
मुंबई: एकेकाळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता, त्या आरोपांना घाबरुनच राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय राऊतांवर टीका केली होती. त्याला शिवसेनेने 'लाव रे तो व्हिडीओ'च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना नेते विनायक राऊत यांनी किरीट सोमय्यांचा जुना व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये किरीट सोमय्या यांनी सध्याचे भाजप नेते नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडी चौकशीला घाबरूनच नारायण राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसऱ्या एका व्हिडीओत नरेंद्र मोदी हे एनडीएचे खोटारडा उमेदवार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केल्याचं दिसत आहे.
नितेश राणेंचे किरीट सोमय्यावर केलेले आरोप
शिवसेनेने दुसरा एक व्हिडीओ दाखवला असून त्यामध्ये नितेश राणे हे किरीट सोमय्यांवर आरोप करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये नितेश राणे म्हणतात की, किरीट सोमय्या हे मराठी भाषेच्या विरोधात असून त्यांनी मुंबईच्या शाळांमध्ये मराठीच्या सक्तीला विरोध केला. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी साऊथ मुंबई ही व्हेजिटेरियन झोन जाहीर करा अशी मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नितेश राणेंनी आरएसएसवर आरोप केला होता असंही विनायक राऊत म्हणाले.
किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर केलल्या आरोपांचे काय झाले याबाबत ईडीकडे चौकशी करणार असल्याचंही विनायक राऊत यांनी सांगितलं.
राजन तेलींनी नितेश राणेंवर केलेल्या आरोपाचा एक जुना व्हिडीओही यावेळी शिवसेनेने शेअर केला आहे. नारायण राणेंचे जुने व्हिडीओ असेच टप्प्याटप्याने लावणार असल्याचंही विनायक राऊतांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
- Narayan Rane : संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर, नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
- Sanjay Raut: शरद पवारांच्या पेरोलवर राहून संजय राऊत शिवसेना संपवत आहेत; चंद्रकांत पाटलांचा आरोप
- Kirit Somaiya Press Conference : निकॉन कंपनीशी निल सोमय्यांचा संबंध आहे की, नाही? किरीट सोमय्या म्हणाले...