Sanjay Raut: शरद पवारांच्या पेरोलवर राहून संजय राऊत शिवसेना संपवत आहेत; चंद्रकांत पाटलांचा आरोप
खासदार संजय राऊतांच्या आरोपांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हेच शिवसेना संपवतील असं ते म्हणाले.
कोल्हापूर: शरद पवारांच्या पेरोलवर (Payroll) राहून संजय राऊत शिवसेना संपवत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांना घेऊन नाही तर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना घेऊन डुबतील अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. संजय राऊत यांनी काल टीका करताना मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांना घेऊन डुबतील अशी टीका केली होती. त्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत हे शिवसेना संपवत आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात कधी येणार असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. कारण शरद पवारांच्या पेरोलवर राहून संजय राऊत हे शिवसेना संपवत आहेत. सत्ता स्थापनेच्या वेळी कुणी कुणाला भरीस पाडले हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. या सत्तेचा उपभोग केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे. छोटे घटक पक्ष सोडा पण काँग्रेस आणि शिवसेनेमधील मोठा गट देखील नाराज असल्याचे या वेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "संजय राऊत तुम्ही कुणाला धमकी देत आहात. आता त्या काळातला भाजप राहिला नाही. ॲक्शनला रिॲक्शन येणार हे लक्षात घ्या. दोषी असतील ते जेलमध्ये जातील, भले ते भाजपचे असले तरी, ज्यांनी चुकी केली ते शिक्षा भोगतील. मात्र गल्लीतल्या दोन मंडळासारखी कसली भाषा करताय. तब्येत बरी असेल तर सांगण्याची आवश्यकता नसते, मात्र तब्येत बरी नसली की मला काही झाले नाही हे वारंवार सांगावे लागते. यंत्रणेवर दोष देता म्हणजे तुम्ही घटनेवर दोष देत आहात."
छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेच नाहीतर मराठा समाजासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना आमचा पूर्णपणे पाठींबा असेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. श्रीमंत शाहू महाराज, उदयनराजे, समरजितसिंह घाटगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरावे. त्या आंदोलनाला समाज म्हणून आम्ही सगळे जोडले जाऊ. या सरकारला मराठा आरक्षण द्यायचं नाही किंवा कोणत्याही पातळीवर काम करायचे नाही. त्यामुळे या सरकार विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
- Sanjay Raut PC 10 Points: पीएमसी बँक घोटाळा ते केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप... संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे
- Sanjay Raut : शिवसेना-भाजप वादाचा दुसरा अंक; किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती
- चप्पल दाखवत किरीट सोमय्या म्हणाले, 'मला जोड्यानं मारताय, मारा मारा पण...'