Uddhav Thackeray : आज माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणार नाही; उद्धव ठाकरेंचा टोला
Shivsena : शिवसेना भवनवर उद्धव ठाकरे यांनी बैठकीचा सपाटा लावला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई: फडणवीसांनी शिंदेंकडून (CM Eknath Shinde) काल माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणारही नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला आहे. सोमवारी एका पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरुन माईक घेऊन स्वत: उत्तर दिलं होतं.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांसमोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिसकावून घेतला. आज माईक हिसकावला, उद्या काय काय हिसकातील हे काही जणांना समजणार नाही.
उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, काल विधानसभेमध्ये रिक्षा सुसाट सुटली होती, त्याचा ब्रेक लागतोय की नाही, त्याचा अपघात होतोय की काय असं अनेकांना वाटत होतं.
एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातले विकृत हासू आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांच्या डोळ्यातले अश्रू यातून मला मार्ग काढायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकांच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत मोजावी लागणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी दिला आहे. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच बंडखोरांचा उल्लेख गद्दार असा केला आहे.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. pic.twitter.com/uc7O3vDmOy
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) July 4, 2022