(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena : राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी शिवसेनेचा नवा प्लॅन? उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार?
Uddhav Thackeray : शिवसेनेला संपवण्यामागे भाजपचा हात असल्याचा प्रचार आणि प्रसार करून आगामी निवडणुकांमध्ये फायदा करुन घेण्याचा प्लॅन ठाकरे गटाचा असल्याचं सांगितलं जातंय.
मुंबई : सध्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला अडचणीत आणण्यासाठी शिंदे गटाकडून (Eknath Shinde) पुरेपूर प्रयत्न होताना पहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात तर अशीही चर्चा आहे की याला भाजपची (BJP) फूस आहे. मात्र तरीही या परिस्थितीत ठाकरे गटाकडून जिकरीचा लढा उभारून संपूर्ण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यासाठी ठाकरे गटाकडून एक विशेष प्लॅन देखील तयार करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पातळीवर पोहचण्यासाठी शिवसेनेचा नवा प्लॅन?
मागील काही दिवसात शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) गटामध्ये सुरू असलेल्या लढ्यात सातत्याने ठाकरे गटाला अपयश येताना पाहायला मिळत आहे. याच बाबीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न आता ठाकरे गटाकडून सुरू आहे. यासाठी ठाकरे गटाकडून एक खास प्लॅन देखील तयार करण्यात आला आहे.
ठाकरे गटाला मिळणाऱ्या अपयशामध्ये प्रामुख्याने शिंदे गटाचा हात असून याला भाजपची फूस आहे असा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे. अशा प्रकारे भाजप आणि शिंदे गटाला राष्ट्रीय पातळीवर डॅमेज करून त्यांची अशी प्रतिमा देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे.
शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रचार
शिवसेनेला (Shivsena) शहीद होण्याची वेळ केवळ शिंदे गट आणि भाजपने आणली आहे अशा पद्धतीचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. याचा फायदा आगामी काळातील निवडणुकांमध्ये करून घेणे आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपसाठी (BJP) सक्षम विरोधक निर्माण करणे असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत आहे.
शिवसेनेच्या शहीद होण्यामागे भाजप असल्याचा दावा करताना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना थेट भाजप विरोधात आघाडी उघडणारे शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अखिलेश यादव यांच्या पंक्तीत बसवण्याचा प्रयत्न होताना पाहिला मिळतं आहे. यासाठी भाजपला व्हिलन आणि उद्धव ठाकरे यांना पिढीत असं पोट्रेट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे.
हा सगळा प्रकार पक्षाचं चिन्हं गोठवण्यात आल्यानंतर ठाकरे गटाकडून प्रामुख्यानं सुरु झाला आहे. यासाठी केंद्र सरकारची मुघल शासकाप्रमाणे तुलना करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरु आहे. यामधे आता ठाकरे गट किती प्रमाणात यशस्वी होणार आणि आगामी काळात खरचं याचा ठाकरे गटाला फायदा होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.