(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यपद नको, आमदार अनिल बाबर सरकारच्या कामावर आणि पक्षावर नाराज
शिवसेनेचे सांगलीमधील खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या नाराजीबाबत बाबर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, मंत्रीपद न मिळाल्याने नव्हे तर मी सरकारच्या कामावर नाराज आहे.
सांगली : ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यापासून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळू लागली आहे. त्यात शिवसेनेचे सांगलीमधील खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांची भर पडली आहे. बाबर पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या नाराजीबाबत बाबर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, मंत्रीपद न मिळाल्याने नव्हे तर मी सरकारच्या कामावर नाराज आहे. त्यामुळे मी आता कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपदसुद्धा घेणार नाही.
बाबर म्हणाले की, मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही आणि मी राजीनामादेखील देणार नाही, पण माझी नाराजी ही सरकारच्या कामाच्या बाबतीत आहे. 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी अजून मंत्रीपदांचा आणि खातेवाटपाचा घोळ सुरू आहे. पण जे खाते मिळेल ते घेऊन जास्त रस्सीखेच न करता तिन्ही पक्षांनी आता लोकांची कामे सुरू करावीत. असा घरचा आहेर खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. विटा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
बाबर म्हणाले की, कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही, हे पद मिळाले तरी आता घेणार नाही. मी मंत्रीपदासाठी इच्छुक होतो, त्यामुळे आता मंत्रीपद मिळाले नाही म्हणून पुन्हा कृष्णा खोरे महामंडळाची मागणी करायची ही माझी भूमिका नाही, असेदेखील बाबर म्हणाले आहेत. मी शिवसेनेसोबतच राहीन आणि 5 वर्षात माझ्या मतदारसंघात खूप कामे मला करता येतील, असेही बाबर म्हणले.
खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद मिळणार अशी दाट शक्यता अंतिम क्षणापर्यंत होती. मात्र त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आमदार बाबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल बाबर राजीनामा देणार, अशी जोरदार चर्चा सुरु होती. तर कार्यकर्त्यांकडूनही बाबर यांच्यावर दबाव निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज अनिल बाबर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विटा येथे पार पडलेल्या अनिल बाबर समर्थकांच्या मेळाव्यात आमदार बाबर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत संयम राखण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. तसेच मला मंत्रीपद हवं होतं, तशी माझी इच्छा होती. मंत्रीपद मला मिळालं नाही, त्यामुळे नी नाराज नाही, असे स्पष्टीकरण अनिल बाबर यांनी यावेळी दिले आहे. तसेच मी पक्षाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. त्याचबरोबर बाबर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीपद आणि खाते वाटपावरुन सुरू असलेल्या घोळाच्या पार्श्वभूमीवर सरकारला घरचा आहेर दिला आहे.