(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महापुरुषांचा पुतळा उभारणीसाठी सरकारची नियमावली काय? पुतळा कोण उभा करू शकतो?
Shivaji Maharaj Statue : राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारची एक नियमावली आहे. सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभा करायचा असेल तर त्यासाठी समिती तयार करावी लागते.
मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील अनेक महापुरुष आणि थोर व्यक्ती यांच्या पुतळाच्या संदर्भामध्ये नवीन प्रश्न निर्माण झालाय. मात्र राज्य सरकारने या संदर्भात 2017 मध्ये नविन पुतळा धोरण आणलं होतं. काय आहे हे पुतळा धोरण ते पाहुयात,
राष्ट्रपुरुष थोर व्यक्तीचा पुतळा उभारायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात यावी. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर महापालिका आयुक्त किंवा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, निवासी उपजिल्हाधिकारी हे त्या समितीचे सदस्य असतील.
पुतळा उभा करण्यासंदर्भात काय आहेत मार्गदर्शक तत्वे?
1. कोणतीही व्यक्ती संघटना संस्था किंवा खाजगी मालकीच्या जागेवर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभा करू शकणार नाही.
2. पुतळा बसविणाऱ्या समितीने तो पुतळा त्याचं साईट प्लॅन, पुतळा ज्या धातू किंवा साहित्यापासून तयार करण्यात येणार आहे त्या धातू साहित्याचे प्रमाण, पुतळ्याचे वजन उंची आणि रंग याचा तपशील पुतळ्याच्या रेखाचित्रासोबत मुख्य वास्तुशास्त्र महाराष्ट्र राज्य किंवा त्यांना अधिकार प्रदान केला आहे. त्या विभागीय कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.
3. पुतळा उभारणाऱ्या संस्थेने पुतळ्याचं क्ले मोडेल त्याला संचनालयाची मान्यता घेऊन ब्रांझ व अन्य धातू फायबर व इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि मान्यता घेतलेल्या क्ले मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी. (राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याला कला संचालनाची सहा फुटाची मंजुरी घेतली होती. मात्र प्रत्यक्ष किल्ला 35 फूट उभारला गेला).
4. पुतळा उभारण्यामुळे गावात कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, त्याचसोबत या पुतळ्याला अल्पसंख्याक व स्थानिक लोकांचा विरोध नसल्याचेही स्पष्टपणे उल्लेख असलेले ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे.
5. शासकीय , निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालय परिसरात पुतळा उभारण्यासाठी संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्रस्तावासोबत असावे.
6. पुतळ्याची देखभाल, मंगल्य पावित्र्य राखण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे करार पत्र पुतळा उभारणार्या संस्थेकडून घेण्यात यावे.
7. राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देताना त्याच राष्ट्रपुरुष थोर व्यक्तीचा पुतळा त्या गावात किंवा शहरांमध्ये दोन किमी त्रिजेच्या परिसरात तत्पूर्वी उभारलेला नाही याची दक्षता घेण्यात यावी.
8. गावात शहरात सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांचे पुतळे बसविण्याबाबत राज्य शासनाकडे मागण्या होतात. मात्र राज्य सरकार या पुतळ्यांसाठी निधी देत नसून पुतळा हा स्थानिक लोकांच्या पुढाकारातून लोक वर्गणीतून बसवला जावा असं अपेक्षित आहे.