पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा निकृष्ट दर्जाची उभारणी असल्याने कोसळला आणि समस्त महाराष्ट्रातील जनता व्यथित झाली.
मुंबई : सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी चक्क तेथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जाऊन तोडफोड केली होती. निकृष्ट दर्जाचा पुतळा बसवल्याचा आरोप करत पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आता, पुतळा दुर्घटनेची आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही वैभव नाईक यांनी म्हटलं. दरम्यान, सरकारी कार्यालयातील तोडफोडप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, आता वकील असीम सरोदे यांनी मदत घेऊन ते याप्रकरणात कायदेशीर लढा देणार असल्याचं पत्रच त्यांनी असीम सरोदे यांना पाठवलं आहे.
जिल्ह्याच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर केवळ 9 महिन्यांपूर्वी उभारलेला आणि पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सध्या असलेले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा निकृष्ट दर्जाची उभारणी असल्याने कोसळला आणि समस्त महाराष्ट्रातील जनता व्यथित झाली. आज सुरु असलेला भ्रष्टाचार व पराकोटीचे स्वार्थी राजकारण यांनी महाराजांची प्रतिष्ठा सुद्धा मालिन केलीच आहे. माझे आपल्याशी फोनवर बोलणे झाले त्यानुसार मला सगळे कायदेशीर मार्ग वापरून राजकोट (Sindhudurg) किल्ल्यावरील प्रकाराला कारणीभूत असलेला भ्रष्टाचार उघड करायचा आहे व त्यासाठी आपली कायदेशीर मदत हवी आहे, असे पत्रच आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी अॅडव्होकेट असीम सरोदे यांना लिहिलं आहे.
असिम सरोदे यांनी कायदेशीर मदत करण्यास होकार दिल्याचंही वैभव नाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. आपण त्वरित होकार दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरील प्रेमापोटी वकिली-फी न घेता मोफत केस चालवेन असे सांगितले त्याबद्दल धन्यवाद, असेही नाईक यांनी म्हटलं आहे. आपण याप्रकरणी सगळे कायदेशीर मार्ग वापरावे आणि आवश्यक त्या प्रक्रिया कराव्यात यासाठी माझ्यातर्फे वकील म्हणून काम करण्यासाठी मी आपल्याला नियुक्त करून संमती देत आहे. आपल्याला सांगू इच्छितो कि, छत्रपतींबद्दल व त्यांच्या विचाराने प्रेरित हे प्रकरण असल्याने आपण फी घेणार नाही व निःशुल्क चालविणार असे सांगितले असले तरी निदान कायदेविषयक प्रक्रियांचा/प्रवासाचा खर्च म्हणून आपणाला आम्ही आनंदाने देऊ त्याचा स्विकार करावा, असेही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता या पुतळा दुर्घटनेची राजकीय लढाई सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
विरोधकांनी राजकारण करु नये
उभारण्यात आलेला छत्रपतींचा पुतळा हा पंचधातूचा नाही, हे पुतळा कोसळल्यामुळे सिध्द झालं आहे . खरतर या सरकारला दर्जेदार उभारुन किल्ल्याचे सुशोभिकरण करायचे असते तर एकच चांगला ठेकेदार दिला असता, मात्र या कामात मोठा भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेला आहे. त्यामुळे या घटनेची जबाबदारी स्विकारुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे. दरम्यान, विरोधकांनी या गोष्टीचं राजकारण करु नये, शिवाजी महाराष्ट्र हे आपलं आराध्य दैवत असल्याचं सत्ताधारी नेते व मंत्र्यांनी म्हटलं आहे.