Ashish Shelar यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जबाबदारी; भाजपला फायदा किती?
भाजपच्या वतीने आशिष शेलार यांच्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीकरता निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांच्या साथीने आशिष शेलार आता कोकणात लक्ष घालतील.
रत्नागिरी : कोकण! शिवसेनेचा बालेकिल्ला. कोकणातील माणसं कायम शिवसेनेच्या पाठिशी उभी राहिली आहेत. केवळ नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला तेव्हा मात्र काही काळ शिवसेनेसाठी या बालेकिल्ल्यात काही प्रमाणात पीछेहाट झालेली पाहायाला मिळाली. पण, त्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा आपला गड ताब्यात घेतला. कोकणातील मतदार कायम शिवसेनेच्या मागे राहिला आहे. मुंबई मनपा असो अथवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा, लोकसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद इथल्या मतदारांनी कायमच शिवसेनेची झोळी मतांच्या रुपाने भरली आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील सर्वाधिक आमदार शिवसेनेचे तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे. कोकण आणि त्यांचं मतदारांचं हे गणित पाहता भाजपने मागील काही दिवसांमध्ये आपल्या नेत्यांना सक्रिय केलेलं दिसून येत आहे.
नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. नितेश राणे आमदार आहेत तर माजी खासदार निलेश राणे यांच्या खांद्यावर देखील जबाबदारी देण्यात आली आहे. प्रसाद लाड रत्नागिरी जिल्ह्यात येतात. सध्या कोकणावर अर्थात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे. किरीट सोमय्या यांचा दापोली दौरा, शिवसेनेतील नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका या गोष्टी बोलक्या आहेत. या साऱ्या गोष्टी घडत असताना आता भाजपच्या वतीने आशिष शेलार यांच्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीकरता निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांच्या साथीने आशिष शेलार आता कोकणात लक्ष घालतील. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आशिष शेलार यांच्यासारखा आक्रमक आणि अभ्यासू नेता दिल्यामुळे भाजपच्या या निर्णयाची चर्चा झाली नाही तर आश्चर्य नाही. दरम्यान, आशिष शेलार यांच्या निरीक्षक म्हणून निवडीनंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप चांगली कामगिरी करेल का? शिवसेनेला कशा प्रकारे याचा फटका बसेल? याच्या चर्चा स्वाभाविकपणे होणारच.
शेलारांच्या निवडीने शिवसेनेला फायदा की तोटा?
कोकणातील वाड्या-वस्त्यांवर शिवसेना पोहोचली आहे. तळागाळापर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात. असं असताना शेलारांचं शिवसेनेला आव्हान किती? या प्रश्नावरुन एबीपी माझाने लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार सतीश कामत यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना "मुळात मुंबईमध्ये देखील लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशा वेळी त्यांच्यावर कोकणची जबाबदारी दिल्यावर फडणवीस आणि शेलारांमधील सुप्त संघर्षामुळे तर त्यांना बाजूला केलं जात नाही ना? असा सवाल निर्माण होतो. मुख्य बाब म्हणजे भाजपचं संघटन काही तळागाळापर्यंच पोहोचलेलं नाही. पण, त्यातुलनेत शिवसेना तळागाळात पोहोचली आहे. भाजपपेक्षा त्यांचं संघटन देखील आहे. त्यामुळे भाजपची ही खेळी किती यशस्वी होईल याबद्दल शंका आहे. मुख्य बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचं राजकीय वर्चस्व आहे. शिवसेनेमध्ये किंवा काँग्रेसमध्ये असताना देखील नारायण राणे यांच्या हाती साऱ्या चाव्या होत्या. सुरेश प्रभू दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. पण, सारी सूत्रे नारायण राणे यांनी हाताळली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे आहेत. शेलारांची त्यांच्यापुढे किती डाळ शिजेल याबद्दल शंका आहे," अशी प्रतिक्रिया दिली.
त्याचवेळी आम्ही मुंबई येथे मंत्रालय, राजकीय बीट कव्हर करणाऱ्या वरिष्ठ पत्रकार संजय परब यांच्याशी देखील संवाद साधत त्यांना बोलते केले. परब सध्या कोकणात स्थायिक झाले आहेत. यावेळी बोलताना संजय परब यांनी "मुळात भाजपची कोकणात ताकदच नाही ही बाब मान्य करायला हवी. भाजपचा जनाधार नाही. नाथ पै, मधु दंडवते यांच्यानंतर समाजवादाच्या पाठिशी असलेला हा मतदार, तरुण वर्ग शिवसेनेकडे गेला. तो कधीच भाजप किंवा काँग्रसकडे आला नाही. तो अद्याप देखील शिवसेनेच्या पाठिशी आहे. काँग्रेसला देखील कोकणातील मतदारांनी साथ दिली नाही. त्यामुळे आशिष शेलार यांच्या खांद्यावर कोकणच्या निरीक्षकपदाची जबाबदारी दिल्यास काही फायदा होईल नाही," असं मत नोंदवले.
मुंबई सोडू नका : आदित्य ठाकरे
रिफायनरीच्या मुद्यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजापूर येथे रिफायनरी समर्थकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी "काहीही झालं तरी मुंबईला येणे सोडू नका. ती तुमच्या हक्काची आहे," असं आवाहन केले. त्यावरुन शिवसेना आणि कोकणी माणसाची वोट बँक यांचा अंदाज येऊ शकते. दरम्यान, हिच बाब हेरत किंवा कोकणी मतदारावर लक्ष ठेवत भाजपने कोकणी नेत्यांच्या खांद्यावर कोकणातील राजकारणाची दिलेली धुरा किती सक्षमपणे पेलली गेली आहे? हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे.
भाजप कार्यकर्त्यांध्ये उत्साह
मुख्य बाब म्हणजे "शेलार यांच्या निवडीमुळे आम्हाला आणखी एक सक्षम आणि आक्रमक नेतृत्व मिळाले. आता लढाई आणखी चांगली होईल," अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्ते देतात. असं असलं तरी येणारा काळ मात्र सर्व राजकीय चर्चांची आणि प्रश्नांची उत्तरं देणार आहे.