(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यंदा शिवसेनेचा 'ऑनलाईन' दसरा मेळावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री आणि शिवाजी पार्क ते सावरकर हॉल असा यंदाचा दसरा मेळावा असणार आहे. ठाकरे कुटुंबियांतील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे.
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांसोबत विरोधकाचं लक्ष लागलंय कारण या मेळाव्यात गेल्या अनेक दिवसांचा राहिलेला हिशोब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चुकता करणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात ठाकरेंच्या भात्यातले बाण कुणाकुणावर चालणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला संबोधणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री आणि शिवाजी पार्क ते सावरकर हॉल असा यंदाचा दसरा मेळावा असणार आहे. ठाकरे कुटुंबियांतली पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा हा काहीसा खास आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या संकंटानं अनेक प्रथा, परंपरा मोडीत निघाल्या राजकारणातही शिवसेनेचे शिवतीर्थावर दसरा मेळावा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. पण कोरोनाचं संकंट असल्यामुळे यंदा सावरकर सभागृहात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
कसा असणार आहे उद्याचा कार्यक्रम?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघून थेट शिवतीर्थावर येतील.
- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतील.
- सावकर सभागृहात मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपुजन होईल.
- काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे.
- त्यानंतर 7 वाजता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधतील
बाळासाहेब ठाकरेंपासून या मेळाव्याला महत्त्व आहे. बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक राज्यभरातून जमत असे बाळासाहेबांची भाषणांची शैली, अभिनय, अधुनमधुन शिव्या आणि विरोधकांवर टीका ही सैनिकांना हवहवीशी वाटणारी होती. दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे.
2019 च्या निवडणुकांनतर महाराष्ट्रातली बरीच गणित बदलली. महाविकास आघाडीच्या रुपानं महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात भाजप हा एकमेव पक्ष असेल ज्यांचा खरपूस समाचार घेतला जाणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेवर विरोधकांकडून चिखलफेक करण्यात आली. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौतचं प्रकरण या सर्वांवर उद्धव ठाकरे शांत होते. या प्रकरणावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता पण उद्धव ठाकरेंनी अतिशय संयमी भूमिका निभावली पण आपण मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून काही विषयांवर बोलणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता त्यामुळे या प्रकरणावर काय बोलणार हे उत्सुकतेचं असणार आहे.