(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dasara Melava : शिंदे गटाच्या मेळाव्याला सदावर्तेंकडून एसटी कर्मचाऱ्यांची रसद? व्हायरल मेसेजवरून चर्चांना उधाण
Shiv Sena Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला कायम वादात असणारे एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांची रसद पुरवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे (Shiv Sena Shinde) आणि ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) पूर्ण जोर लावला आहे. मेळाव्यासाठी चांगली गर्दी जमावी यासाठी विविध नियोजन करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदान (Azad Maidan) येथे होणार आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे होणार आहे. शिंदे गटाच्या खासदार-आमदारांनी, मंत्र्यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी जोरदार तयारी केली आहे. तर, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला कायम वादात असणारे एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांची रसद पुरवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर ऑडिओ क्लीप आणि मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एसटी प्रशासनाकडूनही यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सगळी मदत केली जात असून रजा दिल्या जात असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले
गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी संपाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शिरकाव केला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एसटी कर्मचारी बँकेच्या निवडणुकीत मान्यताप्राप्त संघटनेच्या पॅनलला सदावर्ते यांनी पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर पकड मिळवली असल्याची चर्चा सुरू झाली. आता, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी मेळाव्यासाठी गर्दी जमवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ऑडिओ क्लिप व्हायरल
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.या क्लिपमध्ये सदावर्तेंच्या संघटनेच्या पाटोदा येथील कार्याध्यक्षासोबत एक महिला नेता संवाद साधत आहे. यानुसार, 24 ऑक्टोबर रोजी मुंबईत तुम्हाला यायचं आहे. तुम्हाला ड्युटी लावण्यात येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. कष्टकरी जनसंघाची सभा होणार आहे. याबाबत एसटीचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांच्यासोबत बोलणं झाले आहे. एसटीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. कष्टकरी जनसंघाच्या सभासदांना घेऊन यावे. मुंबईत येण्यासाठी 5000 रुपयांचा खर्च केला तरी चालेल. ही रक्कम तुम्हाला देण्यात येईल, अशी सूचना या महिला नेत्याने एसटीच्या पाटोदा आगाराच्या कार्याध्यक्षाला केली आहे.
एसटी कर्मचारी बँकेचा निधी वापरला? व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटले?
एसटी कर्मचारी बँकेचा निधी आझाद मैदानावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वापरला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एक मेसेज व्हायरल होत असून यामध्ये गंभीर आरोप करण्यात आला आहे.
व्हायरल होणाऱ्या मेसेजनुसार, सदावर्तेंनी कार्यकारणीची बैठक घेऊन आझाद मैदानावरच्या दसरा मेळाव्याला गाड्या घेऊन येण्याचे आदेश दिले. मात्र कर्मचारी जायला उत्सुक नसल्याने मोकळ्या का होईना पण गाड्या घेऊन येण्याचे फर्मान दिल्याने परत संचालक मंडळ कामाला लागले असल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. काही वेळापुर्वीच गाडीच्या भाड्यासाठी यवतमाळ शाखेतून 60 हजार अमरावती शाखेतून, 50 हजार भंडाऱ्यातून एक लाख ॲडव्हान्स संचालकांनी काढल्याचे वृत्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
(विशेष सूचना: व्हायरल होणाऱ्या ऑडिओ आणि मेसेजच्या सत्यतेबाबत आम्ही दावा करत नाही. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये व्हायरल होत असलेल्या मेसेजचा मजकूर आम्ही बातमीत वापरला आहे.)