एक्स्प्लोर
हरवलेल्या गतिमंद मुलांना आधारकार्डमुळं मिळाला आपल्या पालकांचा 'आधार'
प्रशासनाच्या तत्परतेमुळं आणि प्रयत्नामुळं आपल्या मायबापापासून दूर असलेल्या तीन परप्रांतिय लेकरांना पुन्हा आधार मिळाला आहे. धुळे जिल्हा प्रशासन आणि बालकल्याण समितिच्या प्रयत्नामुळे ही मुलं आपल्या पालकांसोबत घरी जाऊ शकली.
धुळे : आतापर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवलेल्या व्यक्तींचा शोध लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र आता आधार कार्डमुळे दुसऱ्या राज्यातील असलेल्या तीन निरागस गतिमंद मुलांना त्यांच्या आईवडिलांची माया पुन्हा मिळाली आहे. आधारकार्डमुळे वेगवेगळ्या राज्यातील हरवलेल्या तीन गतिमंद मुलांना तब्बल चार ते पाच वर्षांनंतर आपले आई-वडील मिळाले आहेत. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि बिहार राज्यातून हरवलेल्या तीन मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात बालकल्याण समिती तसेच शिरपूरच्या बालगृहाला तब्बल चार ते पाच वर्षानंतर यश आले आहे. धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
मोनू शर्मा (बरना, जि. कुरुक्षेत्र, हरियाणा), दीपक (रा. लिधौरा एवनी, जि. झाशी, उत्तरप्रदेश) , मोहम्मद गुड (रा. बाकरपूर, जि. मुंगेर, बिहार) अशी या मुलांची नावे आहेत. त्यापैकी मोनू हा पाच वर्षांपासून हरवला होता. चुकून रेल्वेने प्रवास करत तो हरियाणातून मुंबईला पोहोचला होता. दीपक मागच्या आठवड्यातच उत्तरप्रदेशातून घरातून पळून रेल्वेने भुसावळला पोहोचला. पोलिसांना सापडल्यानंतर त्यांना पुनर्वसनासाठी गतिमंद बालगृहात दाखल करण्यात आले. तिथे प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून तिघांचे आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न झाला.
त्यावेळी या तिघा मुलांचे आधार कार्ड यापूर्वीच काढल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचा आधार डेटा मिळविण्यासाठी त्यांना मुंबई येथे आधार कार्डच्या प्रादेशिक कार्यालयात नेले असता त्यांचे आधार कार्ड हाती आले. आधार कार्डमुळे त्यांचे नाव, पत्ता देखील मिळाला. त्यानुसार बालकल्याण समिती आणि बालगृहाने मुलांच्या पालकांना संपर्क साधून त्यांची मुलं सुखरुप असल्याची माहिती दिली.
मुलांचे पालक त्यांना घेण्यासाठी धुळ्यात आले होते. जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्यासमोर मुलांची आणि पालकांची ओळख परेड झाली. तसेच सर्व कागदपत्रांची तपासणी, पूर्तता करण्यात आली. सर्व खातरजमा झाल्यावर मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. जुजबी माहिती, प्रयत्नांची शिकस्त यामुळेच त्या मुलांच्या आई-वडिलांपर्यंत पोहचण्यास प्रशासनाला यश आलं आहे. पालकांना बऱ्याच वर्षांनंतर बघितल्यानंतर या गतिमंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद बघावयास मिळाला. बऱ्याच वर्षांनंतर घरी जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement