
Sharad Pawar : राज्यपालांची तक्रार आणि संजय राऊतांवर ईडीच्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर: शरद पवार
Sharad Pawar Meets PM Modi : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

नवी दिल्ली: गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांनुसार काम करत नाहीत, ही गोष्ट आपण पंतप्रधानांच्या कानावर घातली. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचा मुद्दाही पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. विधानपरिषदेच्या प्रलंबित 12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी लक्ष घालू असं आश्वासनही दिलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
या दोन मुद्द्याव्यतिरिक्त पंतप्रधानांशी इतर कोणत्याही राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल नियमाला धरुन काम करत नाहीत. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचाही प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवला आहे. ही गोष्ट आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातली. त्यावर पंतप्रधानांनी या मुद्द्यावर लक्ष देण्याचं आश्वासन दिलं."
शरद पवार पुढे म्हणाले की, "मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. हा मुद्दाही आपण नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिला."
हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आणि पुन्हा सत्तेत येणार
ईडीने संजय राऊत आणि इतर नेत्यांवर कारवाई केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला धोका आहे का असं विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, "राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर आहे, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढच्या निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येणार."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी गेल्या वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. सध्या महाराष्ट्रात सुरू महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले होते.
आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
