(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad pawar : शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द
NCP : शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द
Nationalist Congress Party Loses National Party Tag : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. पण 2014 निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षासंदर्भात त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. अरुणाचलप्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड याठिकाणचे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे.
निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय.
Election Commission withdraws national party status of Trinamool Congress, CPI
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
Nationalist Congress Party loses national party tag: EC
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. 2014 नंतरच्या सलग दोन लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यांच्या विधानसभेत राष्ट्रवादीची कामगिरी लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी सहा टक्के मते असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीत तीन किंवा जास्त राज्यामध्ये किमान दोन टक्के मते असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच निवडणूक चिन्ह मिळते. त्याशिवाय नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयाला जागा मिळते. निवडणुकीमध्ये दुर्दशन अथवा इतर सार्वजनिक वाहिन्यावर ब्रॉडकॉस्टिंगसाठी वेळ मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर या सर्वासाठी पक्ष अपात्र ठरतात.
पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा 2019 चे नियम लक्षात घेतले आहेत. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. तेथील आकडेवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षासह तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले ?
15 दिवसांपूर्वी आम्ही आमचे म्हणणं निवडणूक आयोगासमोर मांडले होते. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्ही चांगले यश मिळवले. तेव्हापासून आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. त्यानंतरच्या सर्व लोकसभा निवडणुकामध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवण्यासाठी जी काही मतांची बेरीज संबंध देशभरात मिळवावी लागते, ती टक्केवारी आम्हाला मिळाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आम्हाला स्पष्टीकरण मागितले होते. ते आम्ही दिलेय. त्यांनी घेतलेल्या निर्णायाचा तपशील घेऊन.. जी काही कायदेशीर पावले उचलायची ती उचलू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.