तुमचे शब्द फिरलेत, ह्यांची डोकी फिरली की तुमची गरज संपेल, तटकरेंना शरद पवार गटाचा सल्ला!
Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर सुनील तटकरे यांनी टीकास्त्र सोडले होते. शरद पवार हुकूमशाह, पक्षाची घटना पायदळी तुडवली, राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार गटाने गंभीर आरोप केले होते.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर शरद पवार (Sharad Pawar) गटाने हल्लाबोल केलाय. शरद पवार यांच्यावर सुनील तटकरे (sunil tatkare) यांनी टीकास्त्र सोडले होते. शरद पवार हुकूमशाह, पक्षाची घटना पायदळी तुडवली, राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार गटाने गंभीर आरोप केले होते. त्याच आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी कार्यालयाच्या अधिकृत टविटर अकाऊंटवरुन अजित पवार गटावर टीका करण्यात आली आहे. सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्राने ऐकली होती, वाचली होती, पण आज प्रत्यक्षात अनुभव आला. ज्यांनी तुम्हाला पक्षात घेतलं, बहुमत नसताना तुम्हाला पद दिलं. ज्यांनी तुमच्यावरील आरोपांची, टीकेची पर्वा न करता तुमची साथ दिली, पाठिशी उभे राहिले ते आदरणीय पवार साहेब होते, असे म्हटले आहे. शरद पवार गटाने पोस्ट केलेल्या व्हिडीओत सुनील तटकरे यांचे काही व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये ते शरद पवारांचं कौतुक करताना दिसत आहेत.
व्हिडीओत काय ?
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शरद पवारमुळे मोठी संधी मिळाली. शरद पवार यांच्यामुळे पाच वेळा आमदार झालो. खासदारही झालो. मंत्रिपद मिळाले, असे सुनील तटकरे म्हणताना दिसत आहेत. राजकीय आयुष्यात कुठेलाही प्रसंग आला तर शरद पवार कणखर उभा राहिलेत, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. शरद पवारांनी महाराष्ट्र घडवला. मागील चार पिढ्यांनी त्यांचे नेतृत्व पाहिले, असे तटकरे म्हणाले.
त्याशिवाय व्हिडीओमध्ये सुनील तटकरे यांनी उपभोगलेल्या मंत्रिपदाची यादीच दिली आहे. 2004 मध्ये तटकरे यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले होते.
पाहा नेमकं ट्वीट काय ?
सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्राने ऐकली होती, वाचली होती पण आज प्रत्यक्षात अनुभव आला.
— NCP (@NCPspeaks) January 23, 2024
ज्यांनी तुम्हाला पक्षात घेतलं ते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी तुम्हाला बहुमत नसताना पद दिलं ते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी तुमच्यावर होणाऱ्या आरोपांची टिकेची पर्वा न करता तुमची साथ दिली,… pic.twitter.com/PHgWhWxrWt
तटकरेंवर निशाणा -
सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्राने ऐकली होती, वाचली होती पण आज प्रत्यक्षात अनुभव आला. ज्यांनी तुम्हाला पक्षात घेतलं ते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी तुम्हाला बहुमत नसताना पद दिलं ते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी तुमच्यावर होणाऱ्या आरोपांची टिकेची पर्वा न करता तुमची साथ दिली, तुमच्या पाठीशी उभे राहिले ते आदरणीय पवार साहेब आज तुमच्यासाठी हुकूमशहा झालेत?? तटकरे साहेब ह्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या तोंडी तेंव्हा तुम्हाला तुरुंगात डांबण्याची भाषा होती हे लक्षात असू द्यात!
आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या ह्यांची डोकी फिरली की तुमची ही गरज संपेल हे लक्षात असू द्यात!! असा हल्लाबोल सुनील तटकरे यांच्यावर व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
तटकरे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलेय ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी थेट शरद पवार यांच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं आहे. शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे. ते कुठल्याही नेत्याचा ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचे, असा उल्लेख सुनील तटकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात आहे. शरद पवार यांनी पक्षाची घटना पायदळी तुडवली, असा आरोप केला आहे.