शरद पवार हुकूमशाह, पक्षाची घटना पायदळी तुडवली, राहुल नार्वेकरांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार गटाचे गंभीर आरोप
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी थेट शरद पवार यांच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं आहे.
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमाणेच राष्ट्रवादी कुणाची? याबाबतच प्रकरण निवडणूक आयोगात आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कोर्टातही हे प्रकरण सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी थेट शरद पवार यांच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं आहे. शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे, असा उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केलेय. अजित पवार गटाकडून आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्रिज्ञापत्र सादर करण्यात आले.
शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे. ते कुठल्याही नेत्याचा ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचे, असा उल्लेख सुनील तटकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात आहे. शरद पवार यांनी पक्षाची घटना पायदळी तुडवली, असा आरोप केला आहे. तटकरे यांच्या प्रतिज्ञापत्राने वाद होण्याची शक्यता आहे.
फेरसाक्ष नोंदवण्यात येणार
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि अनिल पाटील (Anil Patil) यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. दरम्यान 20 ते 25 जानेवारी दरम्यान फेरसाक्ष नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांबाबतचा निर्णय होणार ?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच दिला होता. शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल त्यांनी दिला. त्याशिवाय ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यापैकी कुणाच्याही आमदारांना अपात्र केले नाही. या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबतचा निकाल होणार आहे. सुरुवातीची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता दोन्ही पक्षाच्या आमदारांची उटलतपासणी होणार आहे. 31 जानेवारी 2024 पर्यंत राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात निकाल द्यायचा आहे. त्यासंदर्भात आज अजित पवार गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार?
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई ही सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा आयोगात देखील प्रलंबित आहे. पण तो निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान राजकीय वर्तुळात हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, पण अद्यापही हा निकाल लागलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची धाकधूक सध्या वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुरु असलेली सुनावणी आठ डिसेंबरला पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला होता. मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीसंदर्भात लवकरच निकाल येऊ शकतो.