(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापुरात कोव्हिड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेल्या मुलींच्या वसतीगृहात लाजिरवाणा प्रकार
सोलापूरमध्ये कोव्हिड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेल्या मुलींच्या वसतीगृहात लाजिरवाणा प्रकार. विद्यार्थिंनीच्या कपड्यांवर अश्लील शेरेबाजी, महत्वांच्या कागदपत्रांची नासधूस तर मौल्यवान साहित्यांची चोरी.
सोलापूर : शहरात कोव्हिड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेल्या महाविद्यालयात लाजीरवाणा प्रकार घडलाय. सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोरोना बाधितांना ठेवण्यात आलं होतं. मुलींच्या वसतीगृहात असलेल्या कोव्हिड सेंटरमधील कपाटांचे कुलुप तोडून साहित्यांची नासधूस केलीय. इतकचं नाही तर कागदपत्र आणि पैशांची चोरी केल्याचा आरोप विद्यार्थींनी केला आहे. तर मुलींच्या कपड्यांवर अश्लील टिप्पणी देखील केलीय. मुलींच्या वसतिगृहात झालेल्या प्रकाराबाबत मनपा उपयुक्त धनराज पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालिका या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत असून जेल प्रशासनसोबत मिळून तात्काळ चौकशी करून कारवाई करू, असे पांडे म्हणाले.
सोलापूरच्या कारागृहातील एका कैद्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला बाधित कैद्यांवर उपचार करण्यासाठी कोव्हिड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलं. याठिकाणी सोलापूर जिल्हा कारागृहातील कोरोना बाधित आणि संशयित कैद्यांना उपचारासाठी ठेवण्यात आलं होते. सर्व कैदी डिस्चार्ज झाल्यानंतर इतर रुग्णांसाठी देखील या कोव्हिड सेंटरचा वापर केला जातोय. मात्र, कोरोनावर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या या रुग्णांनी असा काही प्रकार केलाय की ते पाहून तुमच्या पायाची आग मस्तकात जाईल.
अचानक लॉकडाऊन झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गावी जावं लागलं. किती दिवस लॉकडाऊन असणार याची खात्री नसल्याने वसतीगृहात राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले साहित्य वसतीगृहातच ठेवले. मात्र, तात्पुरता जेल म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह अधिगृहीत करण्यात आले. वसतीगृहात विद्यार्थिंनींनी आपल्या कपाटातच साहित्य ठेवले होते. ज्यात महत्वाची कागदपत्रे, कपडे, पैसे इत्यादी होते. मात्र, कपाटाचे कुलूप तोडून त्यामधील साहित्यांची नासधूस करण्यात आलीय. महत्वाचे कागदपत्रे फाडण्यात आली, काही जणांचे पैसे आणि इतर साहित्य देखील चोरीला गेलंय. लाजीरवाणी बाब म्हणजे मुलींच्या कपड्यांवर अश्लील शेरेबाजी आणि मोबाईलनंबर देखील लिहिण्यात आलेत. तर विद्यार्थिंनींच्या रुममध्ये दारुच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.
हा सगळा प्रकार एका सभ्य रुग्णामुळे उघडकीस आला. कैद्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर एका व्यक्तीला या वसतीगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, साहित्याची नासधूस पाहून त्यांनी फोनद्वारे माहिती विद्यार्थिंनींच्या पालकांपर्यंत पोहोचवली. तेव्हा हा सगळा प्रकार पालकांच्या लक्षात आला. "अनेक मुलींचे कपडे, फोटो इत्यादी साहित्य त्या ठिकाणी होते. त्यावर गलीच्छ भाषेत लिखाण करण्यात आलं आहे. आम्ही ग्रामीण भागात राहणारे लोक आहोत. महाविद्यालयात मुलींना कोणाच्या विश्वासावर पाठवायचं हा आमच्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, कोणीही याची जबाबदारी घ्यायला तयार नाही" अशी उद्वीग्न प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीच्या आईने दिली. "अनेक विद्यार्थिंनीचे कागदपत्र वसतीगृहातील रुममध्ये होते. त्या कागदपत्रांवर मुलींचे फोटो होते. या फोटोंचा जर गैरवापर झाला तर याला जबाबदार कोण?" असा प्रश्न देखील पालकांनी विचारला.
"आम्ही आमच्या प्राध्यापकांना विचारलं देखील होतं की आम्ही साहित्य घेऊन घरी जाऊ का, मात्र, प्राध्यापकांनी आम्ही साहित्य जपून सुरक्षित ठेऊ असे सांगितले. त्यामुळे आम्ही साहित्य ठेवून गावी आलो. आमचे लॅपटॉप, कपडे इत्यादी साहित्य चोरीला गेले आहेत. मुलींच्या कपड्यांवर अश्लील भाषेत शेरेबाजी करुन त्यावर मोबाईल नंबर देखील लिहिण्यात आला आहे. ही विकृती आहे. हा सगळा प्रकार अतिशय गंभीर आहे. प्रशासनाने या प्रकराची संपूर्ण चौकशी करुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा" अशी प्रतिक्रिया शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिंनीनी दिली.
Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस
दरम्यान महाविद्यालय प्रशासन मात्र या प्रकरणावर आपले हात झटकत असल्याचा आरोप देखील पालकांकडून करण्यात आला. या संदर्भात महाविद्यालयाची बाजू घेण्यासाठी आम्ही महाविद्यालयाचे प्रशासनाशी फोनद्वारे संपर्क केला असता "महाविद्यालय महानगरपालिकेने अधिगृहीत केलेलं होतं. त्यामुळे ही जबाबदारी महापालिकेची आहे. आम्ही पालिका आयुक्तांना भेटून या संदर्भात चर्चा करणार आहोत. पोलिसात देखील तक्रार देण्याचा आमचा विचार सुरु आहे. अद्याप कोणत्याही पालकाची आमच्या पर्यंत तक्रार आली नाही." अशी प्रतिक्रिया महाविद्यालयातर्फे फोनवरुन देण्यात आली.
तर या सगळ्या प्रकारावरुन सामाजिक संघटनादेखील आक्रमक झाल्या आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सत्तार पटेल यांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची विनंती केलीय. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात येणार आहे. "घडलेला प्रकार हा लज्जास्पद असून, पालिका किंवा महाविद्यालयाने याची जबाबदारी घ्यावी. चोरी किंवा नासधूस झालेल्या कागदपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थिंनीना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. ते कागदपत्र परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत." अशी मागणी अभाविपच्या रेवती मुरलीआर यांनी केली.
Covid OPD | महाराष्ट्रातील पहिली पोस्ट कोव्हिड ओपीडी, दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांवर उपचार!