Shakti Cyclone : कोकण किनारपट्टीला 'शक्ती' चक्रीवादळाचा धोका, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा; मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Shakti Cyclone : कोकण किनारपट्टीवर प्रशासन सतर्क झाले असून, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Shakti Cyclone : सध्या अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचे चक्रीवादळ (Shakti Cyclone) सक्रिय झाले असून, ते पुढील काही तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. या वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता, कोकण किनारपट्टीवर प्रशासन सतर्क झाले असून, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत.
Shakti Cyclone : मच्छीमारांसाठी सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग किनारपट्टीसह कोकणातील सर्वच बंदरांवर दोन नंबरचा बावटा फडकावण्यात आला असून, हे संकेत मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा देणारे आहेत. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, उरण या भागांमध्ये मच्छीमारांना बंदरावर थांबवण्यात आले आहे. सध्या समुद्रात लाटांची उंचीही वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 4 ते 5 ऑक्टोबर दरम्यान समुद्रात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
Shakti Cyclone : पर्यटकांसाठी विशेष सूचना
वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही अधिक खबरदारी बाळगावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे. समुद्राच्या पाण्यात उतरणे, किनाऱ्याजवळ फिरणे किंवा जलक्रीडा प्रकारांपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामानातील बदलामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीजवळील नागरिकांचे स्थलांतरही सुरू करण्यात आले आहे.
Shakti Cyclone : मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा (अलर्ट) जारी केला आहे. वादळाचा परिणाम म्हणून काही भागांत मुसळधार पाऊस, जोरदार वारे, वीजांच्या कडकडाटासह वातावरणात अचानक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Shakti Cyclone : अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन
सध्या वादळाची तीव्रता जरी फार मोठी नसली, तरी हवामानातील वेगाने बदलणाऱ्या स्थितीमुळे स्थानिक प्रशासन सतर्क आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सुचना आणि आदेशांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
Sindhudurg News : शिरोडा-वेळागर समुद्रकिनाऱ्यावर बुडालेल्या दोघांचा शोध सुरू
दरम्यान, शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले 9 पर्यटक दोन दिवसांपूर्वी बुडाले होते. त्यातील दोघे वाचले असून या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह आढळले. तर अजूनही दोघे जण बेपत्ता आहे. बेपत्ता असलेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत मिळालेल्या पाच पर्यटकाचे मृतदेह तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. इरफान कित्तुर आणि जाकीर मणियार हे पर्यटक अद्यापही बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.
आणखी वाचा
























