मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना कोकणातील मुळगावी आणण्याबाबत विचार सुरू : उदय सामंत
रत्नागिरीत शिमग्याकरता आलेल्यांची संख्या ही 1 लाख 16 हजार आहे. ही लोकं लॉकडाऊननंतर रत्नागिरीमध्ये आलेली नाहीत. अशा लोकांची संख्या ही 900 ते 1000 च्या घरात असल्याचं देखील सामंत यांनी स्पष्ट केले.

मुंबई : मुंबईस्थित कोकणातील चाकरमान्यांना गावी आणण्याबाबतच्या मुद्यावरून सध्या कोकणात राजकारण देखील सुरू असल्याचं दिसून येतयं. दरम्यान, या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. ही वेळ राजकारणाची नाही. योग्य वेळी आणि योग्य ती खबरदारी घेत चाकरमान्यांना त्यांच्या मुळगावी आणलं जाईल. त्याबाबत अद्याप चर्चा सुरू असून कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाय, रत्नागिरीत शिमग्याकरता आलेल्यांची संख्या ही 1 लाख 16 हजार आहे. ही लोकं लॉकडाऊननंतर रत्नागिरीमध्ये आलेली नाहीत. अशा लोकांची संख्या ही 900 ते 1000 च्या घरात असल्याचं देखील सामंत यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊननंतर सध्या मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये कोकणातील लाखो लोक अडकून पडले आहेत. कामानिमित्त लाखो लोक या शहरांमध्ये वास्तव्य करत आहेत.पण, आता मात्र त्यांना त्या ठिकाणी राहणे दिवसेंदिवस अवघड होताना दिसत आहे. भाड्याची खोली आणि कमी जागा असल्याने जास्त लोकांना एका ठिकाणी राहणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यामुळे आता आम्हाला आमच्या गावी परतू द्या अशी मागणी देखील सध्या जोर धरत आहे. या साऱ्या प्रकरणात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत जातीने लक्ष घालताना दिसत आहेत. कारण, चाकरमान्यांना कोकणातील मुळगावी आणण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
लाखोच्या संख्येनं येणाऱ्या लोकांना कुठे ठेवायचे? त्यांना कोणत्या वाहनांनी आणायचे? कोकण रेल्वे किंवा एसटी याकरता वापरता येऊ शकते का? गावी आल्यानंतर त्यांची आरोग्याच्या दृष्टीने कशी काळजी घेणार? याबाबत सध्या विचार सुरू आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी देखील बोलणार असून प्रशासनाशी देखील चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता कोकणवासियांना आपल्या मुळगावी आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोक हे लॉकडाऊननंतर आपल्या मुळगावी आले आहेत. शिवाय, अनेकजण शक्य असेल त्या मार्गाने, नवीन शक्कल लढवत आपल्या मुळगावी येण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
गावच्या लोकांची होत आहे घालमेल मायानगरी मुंबईमध्ये कुणाचा मुलगा, मुलगी, काका, काकी, किंवा नातेवाईक हा कामानिमित्त सध्या वास्तव्य करत आहे. एकंदरीत प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती ही मुंबईमध्ये स्थायिक आहे. स्व:ताचे घर नसेल तरी भाड्याच्या घरात नागरिक राहत आहेत. पण, कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि सारी परिस्थिती बदलली आहे. पगार होत नसल्यानं आर्थिक चणचण देखील निर्माण झाली आहे. भाडे द्यायचे तरी कसे? पोटाची भूक भागवायची तरी कशी? असा प्रश्न देखील त्यांना पडला आहे. त्यामुळे सारी परिस्थिती पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर गावच्या लोकांच्या जीवाची देखील घालमेल होत आहे. आमच्या नातेवाईकांनी परत आणा अशी मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, आता कोकणी माणसाला मुळगावी आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली होत असल्याचे ऐकल्यानंतर अनेकांनी समाधान देखील व्यक्त केले आहे.
संबंधित बातम्या :























