(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत 'सीरियल मॉलेस्टर' ला बेड्या, 9 वर्षात 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग
मालाड पूर्व दिंडोशी पोलिसांनी अटक केलेला आरोपी कल्पेश देवधर याने ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्याच्यावर याआधीही मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, अपहरणासारख्या गंभीर गुन्हांची नोंद आहे.
मुंबई: गेल्या 9 वर्षात आपण 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केला असल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. मालाड पूर्व दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तीस वर्षीय 'सीरीयल मॉलेस्टर' च्या चौकशीमध्ये ही धक्कादायक बाब उघड झालीय. या आरोपीला 2011 साली एका महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. मात्र त्यापासून कोणताही धडा न घेता या नराधमाने आणखी 50 महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला.
पोलीसांनी केलेल्या चौकशीतून हा प्रकार उघड झाला आहे. अशाच प्रकारचे आणखी एक प्रकरण दिंडोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलं होतं. त्यावेळी आरोपीने एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करुन पळ काढला होता. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता.
आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक चव्हाण आणि उपनिरीक्षक गणेश फड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आलं होतं. या पथकानं सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. त्यामाध्यमातून पोलीस आरोपी कल्पेश देवधरपर्यंत पोहचले आणि त्याला अटक केली. आरोपी कल्पेश देवधर हा ड्रायव्हर असून चारकोप येथे राहतो.
एखादा गुन्हा केल्यानंतर कल्पेश देवधर वारंवार आपला पत्ता बदलायचा असं समोर आलंय. मुंबईमध्ये विविध पोलिस स्टेशनमध्ये कल्पेश्वर विनयभंग, अपहरण असे मिळून 12 गुन्हे दाखल आहेत, ज्यात त्याला अटक ही झाली होती. काही गुन्हे आहेत ज्यामध्ये कल्पेश देवधर हा वॉन्टेड आहे तर काही विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये कल्पेश विरुद्ध पीडितेकडून तक्रार करण्यात आली नाही. 13 जुलै 2017 रोजी कल्पेश देवधर याने पवई हिरानंदानी येथे महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनीसमोर अश्लील चाळे करून फरार झाला होता असंही पोलिसांच्या चौकशीतून बाहेर आलं आहे.
तक्रार दाखल करण्याचं आवाहन कल्पेश देवधर आपली आई आणि तीन बहिणी सोबत मालाड येथे राहत होता. मात्र कल्पेशच्या या सवयीमुळे आणि वारंवार गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याच्या कुटुंबातून त्याला बाहेर काढण्यात आलं. तेव्हापासून तो वेगळा राहू लागला. आरोपीवर विनयभंग, मारामारी, अपहरण आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे असे गंभीर गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. आत्तापर्यंत सुमारे 50 महिलांचा विनयभंग केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. मात्र बहुतांश प्रकरणामध्ये पीडित महिलांकडून तक्रार करण्यात आली नाही. या प्रकारानंतर पोलिसांनी पीडितांना समोर येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.
पहा व्हिडिओ: Special Report | मुंबईत सीरियल मॉलेस्टरला बेड्या, 9 वर्षात 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग
महत्वाच्या बातम्या:
- TRP घोटाळा : BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक; या प्रकरणातली चौदावी अटक
- फ्लाईटने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या बंगळुरुच्या ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
- पोलीस असल्याचं भासवत लोकांना फसवणाऱ्या टीव्ही कलाकाराला अटक; मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई
- विलेपार्ले पोलीस ठाण्याला 'सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत' पुरस्काराचा बहुमान!