राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचा लढा अयशस्वी; 14 दिवसांनी कोरोनामुळे मृत्यू
ठाण्यातील कळवा विभागातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचा कोरोना विरोधातील लढा अयशस्वी ठरला. गेल्या 14 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
ठाणे : ठाण्यातील कळवा विभागात गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे आज पहाटे कोविड-19 आजारामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर गेले चौदा दिवस मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची या आजाराशी सुरु असलेली झुंज आज अखेर अयशस्वी ठरली. त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा देखील त्रास होता. डॉक्टरांनी या आजारातून त्यांना मुक्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, सगळे प्रयत्न विफल ठरले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे.
मुकुंद केणी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा विभागात निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक होते. ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून सलग दोन वेळा निवडून आले होते. सध्या त्यांच्या पत्नी प्रमिला केणी या ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेत्या आहेत. या लॉकडाउनच्या काळात देखील मुकुंद केणी यांनी सढळ हाताने सर्वांना मदत केली. त्यातच एका रुग्णाला दाखल करण्यासाठी ते कळवा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्याच्या दोन दिवसानंतर त्यांनादेखील ताप येऊ लागला. त्यामुळे टेस्ट केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. तेव्हापासून 14 दिवस त्यांच्यावर मुंबईच्या खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. चौदा दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल (9 जून) त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर त्यांची झुंज आज पहाटे अयशस्वी ठरली.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून श्रद्धांजली त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे नेता आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच ठाण्यातील महापौर नरेश म्हस्के यांनी देखील फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मुकुंद केणी यांच्या जाण्याने ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.
Children stuck in Lift | कल्याणमधील इमारतीत तांत्रिक बिघाडामुळे लिफ्टमध्ये तीन लहान मुलं अडकली