Chaityabhumi : सोमनाथ वाघमारेंच्या 'चैत्यभूमी' माहितीपटाची आंतरराष्ट्रीय भरारी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये स्क्रीनिंग पार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाशी (Mahaparinirvan Din) संबंधित आणि चैत्यभूमीवर भाष्य करणाऱ्या या माहितीपटाची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये स्तुती झाली.
![Chaityabhumi : सोमनाथ वाघमारेंच्या 'चैत्यभूमी' माहितीपटाची आंतरराष्ट्रीय भरारी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये स्क्रीनिंग पार screening of chaityabhoomi documentary of somnath waghmare at london school of economics Chaityabhumi : सोमनाथ वाघमारेंच्या 'चैत्यभूमी' माहितीपटाची आंतरराष्ट्रीय भरारी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये स्क्रीनिंग पार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/0fe11d48f4ae3584fb55ef41b9823634169825570831993_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे या तरुणाने बनवलेल्या 'चैत्यभूमी' या माहितीपटाचे (Chaityabhumi Documentary) नुकतेच आंतरराष्ट्रीय स्क्रीनिंग लंडनमध्ये पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी शिक्षणाचे धडे गिरवलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये या माहितीपटाचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्क्रीनिंग पार पडले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या (London School of Economics) मीडिया आणि कम्युनिकेशन विभागात 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.30 वाजता या माहितीपटाचे स्क्रीनिंग पार पडले. यावेळी माहितीपटाचे दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे (Somnath Waghmare) यांनी माहितीपटाबाबत विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला. यावेळी मान्यवरांनी या माहितीपटाचे कौतुक देखील केले.
चैत्यभूमीच्या सांस्कृतिक महत्वावर प्रकाश टाकणारा माहितीपट
या माहितीपटाबाबत अधिक बोलताना सोमनाथ वाघमारे म्हणाले की, या माहितीपटासाठी तामिळ चित्रपट निर्माते पा. रंजित यांच्या निलम प्रोडक्शनने प्रस्तुती केली आहे. हा म्युझिकल माहितीपट मुंबईतील चैत्यभूमीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकणारा आहे. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी अंतिम संस्कार झाले होते. भारतातील दलित चळवळीसाठी एक महत्वपूर्ण पवित्र स्थान असलेल्या चैत्यभूमीला 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेल्याने एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. माहितीपटात याविषयी भाष्य करण्यात आले आहे.
या माहितीपटात समकालीन भारतात या दिवसाबाबत कशाप्रकारे प्रासंगिकता आहे आणि हा दिवस कोणत्या मार्गाने पाळला जातो हे या माहितीपटात दाखवले आहे. शिवाय यामध्ये महापरिनिर्वाण दिनाचा सन्मान करण्यासाठी दलित समाज कसा एकत्र येतो आणि त्यांची ओळख आणि सशक्तीकरण यावर त्याचा काय राजकीय परिणाम होतो यावरही भाष्य करण्यात आलं आहे.
कोण आहेत सोमनाथ वाघमारे? (Who Is Somnath Waghmare)
सोमनाथ वाघमारे यांच्याविषयी अधिक माहिती अशी की, सोमनाथचा जन्म सांगली (Sangli) जिल्ह्यातील मालेवाडी नावाच्या एका छोट्या गावात एका ग्रामीण दलित-बौद्ध कुटुंबात झाला. त्यांची आई त्यांच्या गावात शेतमजूर म्हणून काम करत होती. त्याचे दोन्ही आजोबाही मजुरीचे काम करायचे. सोमनाथ त्यांच्या गावातील दलित आंबेडकरी जातीच्या वस्तीत 22 वर्षे राहिले. त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून समाजशास्त्र विषयात कला शाखेची पदवी, पुणे विद्यापीठातून मीडिया आणि कम्युनिकेशन स्टडिजमध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून एम.फिल. ही पदवी मिळवली आहे. ते सध्या TISS मध्ये Ph.D स्कॉलर असून त्यांच्या प्रबंधाचा विषय 'महाराष्ट्रातील जात, चित्रपट आणि सांस्कृतिक राजकारण: मराठी चित्रपटांचा अभ्यास' असा आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)