खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक दिल्लीत बसले आहेत : संजय राऊत
सामना अग्रलेखावरून प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ''मला वाटत नाही की, नाराजी नाट्य फार आहे. सामनाचा एक स्वभाव आहे. एखादी गोष्ट सांगताना आम्ही आमच्या पद्धतीने सांगतो. अधिक सोपी करून सांगतो. चांगली उदाहणंही देतो.'
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून जुनी खाट कुरकुरतेय? या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. यावरून पुन्हा एकदा काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अग्रलेखावरून बोलताना, 'आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्याकडे मांडू. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. त्यानंतर सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय," असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. दरम्यान, सामनातील अग्रलेखावरून संजय राऊत यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवरही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत बोलताना म्हणाले की, 'मला वाटत नाही की, नाराजी नाट्य फार आहे. सामनाचा एक स्वभाव आहे. एखादी गोष्ट सांगताना आम्ही आमच्या पद्धतीने सांगतो. अधिक सोपी करून सांगतो. चांगली उदाहणंही देतो. काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. राजकारणात मुरलेला पक्ष आहे. त्यांचे नेते नवे आहेत, तसेच अनेक नेते जुने जाणतेही आहेत. खाट जुनी असली की कुरकुरते जास्त. कारण त्यांना त्यांच्या परंपरेच्या, आपल्या नेतृत्त्वाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. मग ते बोलायला लागतात. तसचं महाराष्ट्रात जे प्रमुख नेते आहेत, बाळासाहेब थोरात अत्यंत सयंमी नेते आहेत ते, दुसरे अशोकराव चव्हाण, जे राज्याचे मुख्यमंत्री होते. यांनी त्यांची भूमिका वृत्तपत्राच्या माध्यमातून, मुलाखतीतून मांडली.'
काँग्रेस नेत्यांनी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभागी केलं जात नसल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'सरकारच्या निर्णयात विश्वासात घेतलं जातं की, नाही यावर चर्चा होईलच. पण शेवटी निर्णय कॅबिनेटमध्ये घेतले जातात. माझ्या माहितीप्रमाणे सरकारला सहा महिने झाले, या दिवसांत खूप मोठा निर्णय सरकारने घेतलेला नाही. सरकारने पहिला निर्णय घेतला कर्जमाफीचा, त्यानंतर दुसऱ्या महिन्यापासूनच कोविडच्या संकटाशी लढतोय आपण, त्यात तुफान आलयं कोकणामध्ये. या दोन्ही संकटांशी लढताना निर्णय घेतले गेले, ते कॅबिनेटने घेतले, मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये संपूर्ण कॅबिनेटसहभागी असतं.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'दोनही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री त्यांना भेटतील, चर्चा होईल. थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि माझी चर्चा झाली, हे काँग्रेस नेते त्यांना भेटतील सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. सगळ्याचं संबंध प्रेमाचे आहेत. सरकारला काही गडबड नाही, तुम्ही ते डोक्यातून काढून टाका.'
पाहा व्हिडीओ : खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी सारखे मॅकेनिक बसलेत दिल्लीमध्ये : संजय राऊत
खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक बसले आहेत दिल्लीमध्ये : संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी पुढे बोलताना सरकार 5 वर्ष चालणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'जर कोणी राजभवनाच्या दारात बसले असतील यांचं काहीतरी वाजेल आणि मग आम्ही पहाटे आतमध्ये जाऊन शपथ घेऊ, तर असं काहीच होणार नाही. सरकार 5 वर्ष चालावं ही सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि शिवसेना यासर्वांची ठाम भूमिका आहे.' तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, 'खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक बसले आहेत दिल्लीमध्ये. मेन्टेन्स करायला, रिपेअर करायला. चांगले नेते आहेत ते.'
लढाई आकड्यांशी नाही, रोगाशी आहे : संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनेक आरोप केले आहेत. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या अनेक ठिकाणी दौरे करून माहिती घेत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना अनेक अधिकारी माहितीही देत असतील. या संदर्भात पालिका आयुक्त इकबाल चहल, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे जे आकडे आहेत, ते कोणीही लपवण्याचं कारण नाही.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'या सरकारचा स्वभाव चारित्र्य नाही लपवा छपवी करण्याचं. आम्ही लढण्यासाठी मैदानात उतरलो आहोत कोविड विरोधात. ही लढाई आकड्यांशी नाही, तर त्या रोगाशी आहे.
गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे : संजय राऊत
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही चौकशी करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सागंतिलं आहे. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'बॉलिवूडमधील महत्त्वाचा अभिनेता जेव्हा आत्महत्या करतो. त्यासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. तेव्हा गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. कारण लोकांच्या मनातील शंका दूर करणं हे सरकारचं काम आहे.'
महत्त्वाच्या बातम्या :
आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत, आमच्या भेटीनंतर 'सामना'ने पुन्हा अग्रलेख लिहावा : बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आज मुख्यमंत्र्यांना भेटणार