Electric Cycle : 14 वर्षाच्या मुलाची कमाल! पेट्रोल महागल्याने कामावर पायी जाणाऱ्या वडिलांसाठी बनवली इलेक्ट्रिक सायकल
Jugad Electric Cycle : एका 14 वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांसाठी जुगाड करून इलेक्ट्रीक सायकल तयार केली आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने त्याच्या वडिलानी दुचाकी ऐवजी पायी कामावर जाण्याचा निर्णय घेतला होता.
Jugad Electric Cycle : पेट्रोलच्या किंमतींनी गाठलेल्या विक्रमी उच्चांकी दरामुळे अनेकांनी कारच नव्हे तर दुचाकीदेखील वापरणे अनेकांनी बंद केले आहे. प्रवासासाठी इतर मार्गाचा अवलंब केला जात आहे. अनेकांनी पायी प्रवासाचा मार्ग अवलंबला आहे. पेट्रोल महागल्याने कामावर पायी जाणाऱ्या वडिलांसाठी मुलाने जुगाड करत इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. ही ई-सायकल दोन तासांच्या चार्जिंगवर 50 किमीपर्यंत धावते. ही ई-सायकल तयार करणाऱ्या मुलाचे वय अवघे 14 वर्ष आहे.
सांगली जिल्ह्यातील वांगी गावच्या सुशांत मेटकरी या मुलाने आपल्या वडिलांना कामावर सायकल वरून सहजरित्या जाता यावे यासाठी इलेक्ट्रिक सायकल बनवलीय. ही सायकल 2 तास चार्ज केली की 50 किमीपर्यंतचा पल्ला गाठत असल्याची माहिती सुशांतने दिली. सुशांतने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना आणि दुर्दैवाने त्याला या वयात हाय-शुगरचा त्रास असताना वडिलांसाठी त्याने इलेक्ट्रिक सायकल तयार केली.
पेट्रोल दरवाढीमुळे सुशांतच्या वडिलांनी कामावर जाण्यासाठी दुचाकी वापरणे सोडून दिले. त्यांनी पायी चालत कामावर जाण्यास प्राधान्य दिले होते. मग या पेट्रोल दरवाढीवर एक उपाय म्हणून सुशांतच्या डोक्यात इलेक्ट्रिक सायकल बनवण्याचा विचार आला. त्यानंतर त्याने ई-सायकल तयार करण्यास सुरुवात केली.
सुशांतने आपली सायकल बाहेर काढली. या सायकलला 12 व्होल्टच्या 2 बॅटरी जोडल्या. आता.ही सायकल 2 तास चार्ज केली की 50 किमीपर्यंत विना पॅडेल मारता प्रवास करते, असे सुशांतने सांगितले. पेट्रोल वाढले म्हणून दुचाकी वापरणे बंद केलेल्या दत्तात्रय यांना मात्र आपल्या पोराच्या हुशारीच्या जोरावर दोन चाकी आणि पॅडेल न मारता फक्त रेस वाढवली की पळणारी इलेक्ट्रिक सायकल मिळाली आहे. त्यामुळे त्यांना मुलाचे कौतुक आहे.
आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना सुशांतने तयार केलेल्या या ई-सायकलबद्दल नातेवाईक आणि परिसरात कौतुक करण्यात येत आहे.