इतिहासाचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी कटिबद्ध, शाईफेक प्रकरणावर संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया
Girish Kuber : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता.
Girish Kuber : ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडने आज, रविवारी गिरीश कुबेर यांच्या तोंडावर शाही फेकून निषेध व्यक्त केला. या घटनेचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'छत्रपती संभाजी महाराज यांच्या चुकीचा इतिहास या पुस्तकात लिहिण्यात आला आहे. त्यावेळी राज्य शासनाला सुद्धा हे लिखाण तत्काळ मागे घ्यावे अशी विनंती संभाजी ब्रिगेडने केली होती. परंतु, तसे न झाल्याने आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या पुस्तकाचे लेखक असलेल्या गिरीश कुबेर यांच्या तोंडावर शाही फेकली आहे. इतिहासेच विद्रुपीकरण थांबविण्यासाठी संभाजी ब्रिगेड नेहमीच कटिबद्ध आहे, असे मनोज आखरे म्हणाले.'
नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी सांगितलेय.
नेमका वाद काय आहे?-
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.
शेवटच्या दिवशी खळबळ –
कोरोनाच्या सावटामुळे यंदाचे संमेलन होणार की नाही यावरच प्रथम शंका उपस्थित करण्यात येत होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रूग्णांच्या संखेत घट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संमेलन घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्याची तारीख पक्की करण्यात आली. नंतर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. परंतु,प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शस्त्रक्रीया झाल्यामुळे तेही संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. याबरोबरच संमेलन पत्रिकेत नाव न टाकण्यात आल्याच्या नाराजीवरून भाजप नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही संमेलनाला उपस्थित राहिले नाहीत. अशा घडामोडीनंतर संमेलनाला सुरूवात झाली. परंतु, पहिल्याच दिवशी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे थोडीसी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. संमेलनाचा दुसरा दिवस सुरळीत गेला असतानाच आज समारोपाच्या दिवशी सकाळीच तपासणी करत असताना प्रवेशद्वारावर पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ही घटना ताजी आहे तोपर्यंत दुपारी गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाई फेकण्यात आली.
दरम्यान, साहित्य संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्य रसिक, साहित्यिक, कलाकार दाखल झाले होते. पहिल्या दिवशी सकाळी संमेलनाला सुरूवात होण्यापूर्वी सोलापूर येथील कलाकारांनी संत गाडगे महाराजांचा वेश परिधान करून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या बाहेर साफसफाई केली. त्यानंतर कुसुमाग्रजांचे निवासस्थान असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महापौर निवासस्थान रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नल, सीबीएस चौक- आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड मार्गे नेहरू गार्डन मार्गे निघून सार्वजनिक वाचनालय इथे दिंडीचा समारोप झाला. दिंडीत शाळकरी मुलं, ढोल पथक, वारकरी सहभागी झाले होते, दिंडी मार्गावर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह साहित्य रसिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, लोकहितवादी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.