Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Anjali Damania on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर भुजबळ भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Anjali Damania on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. तसेच सोमवारी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. भुजबळ-फडणवीस यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा देखील झाली. यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, हे मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं, असे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
अंजली दमानिया म्हणाल्या की, भुजबळ हे भाजपमध्ये जाणार हे मी आज नाही, तर फेब्रुवारी महिन्यातच मी सांगितलं होतं. आता, त्यांनी एक मस्त नाटक रंगवलं आहे. त्यानुसार भुजबळांना मंत्रिपद न देणं. मग त्यांनी थोडंसं चिडल्यासारखं करणं, विशेष म्हणजे अजित पवार व सुनील तटकरे यांनी देखील भुजबळांची भेट घेतली नाही. मग भुजबळांनी एक मेळावा घेऊन पुन्हा फडणवीसांना भेटायला गेले हे सगळं रंगवलेलं आहे. तेव्हा मी ट्विट केल्यामुळे हे लांबणीवर पडलं होतं. मात्र, हे आता भाजपमध्ये जात आहेत, कारण भाजपलाही एक ओबीसी चेहरा त्यानिमित्ताने मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
अंजली दमानियांनी फेब्रुवारीत केलेलं ट्विट
दरम्यान, अंजली दमानिया यांनी भुजबळांबाबत फेब्रुवारीमध्ये केलेले ट्विट आता चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, भुजबळ भाजप च्या वाटेवर? एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले भुजबळ?
दरम्यान, छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलंय की, मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक गोष्टींची चर्चा झाली. सामाजिक, राजकीय गोष्टींवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलंय की, यावेळेस आपल्याला महाविजय मिळालेला आहे. महायुतीच्या यशामागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले. त्याबाबत आपण सर्वप्रथम ओबीसींचे आभार मानले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे. पण आता राज्यात जे काही सुरू आहे त्यामुळे मला आठ ते दहा दिवस तुम्ही द्या. आठ, दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
आणखी वाचा