Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
Congress : आगामी नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. काँग्रेस पहिली यादी लवकरच जाहीर करु शकते.
नवी दिल्ली : नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत 35 जागांबाबत चर्चा झाली असून 28 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री अतिशी यांच्या समोर कालका विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अलका लांबा यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तिथं त्यांना फायदा झाला होता. कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली होती. 11 वर्षानंतर पुन्हा एकदा नवी दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न सुरु केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसनं सीमापुरीतून राजेश लिलोठिया, जंगपुरामधून फरहाद सुरी, मटिया महलमधून आसिम अहमद, बिजवासनमधून देवेंद्र सहरावत यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. आसिम अहमद खान आणि देवेंद्र सहरावत हे आपचे माजी आमदार आहेत. दोन्ही नेत्यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आसिम अहमद खान यांना अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपातून मंत्रिमंडळातून बाहेर काढलं होतं. तर, देवेंद्र सहरावत हे यापूर्वी भाजप आणि शिवसेनेत होते. आता ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
काँग्रेसची जाहीरनाम्यासाठी बैठक
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी सुरु केली आहे. यावेळी दिल्लीत विजय मिळवायचा या इराद्यानं काँग्रेसनं तयारी सुरु केली असून पार्टीनं बुथ स्तरावर काम करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत दिल्लीच्या काँग्रेस अध्यक्षांनी जी आश्वासनं आपण पूर्ण करु शकतो, त्याचा समावेश जाहीरनाम्यात करायला हवा, असं म्हटलं होतं.
दिल्लीत गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. काँग्रेसला दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचं नेतृत्त्व जागा वाटप आणि पक्षांतर्गत नाराजीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती आहे. 28 डिसेंबरला राहुल गांधी उत्तर पूर्व दिल्लीतील सीमापुरी भागात सभेला संबोधित करणार आहेत.
नवी दिल्लीत तिरंगी लढत
नवी दिल्ली विधानसभा निवडणूक तिरंगी होणार आहे. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप हे तीन पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतील. भाजपला गेल्या कित्येक वर्षांपासून नवी दिल्लीत सत्ता मिळवण्यात आलेली नाही. भाजपचा देखील यावेळी नवी दिल्लीत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असेल.
इतर बातम्या :