(Source: ECI/ABP News/ABP Majha)
करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले; सदाभाऊ खोत यांची टीका
सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नाहीत. अशोक चव्हाण तुम्ही वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत आला आहात. अशोक चव्हाण यांना देण्यात आलेल्या जबाबदारीवरून बाजूला करा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र हे करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने कोर्टात योग्यरित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतलं नाही, वकिलांना मार्गदर्शन केलं नाही. गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावे जोडले नाही, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर मराठा आरक्षणावरुन टीका केल्यानंतर त्याला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलंय. अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर मानसिक परिणाम झाल्याची टीका केली होती. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी अशोक चव्हाण यांना वेड्याच्या रुग्णालयात जाण्याची तुमच्यावर वेळ आली आहे. त्यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या उपसमितीची जबाबदारी काढून घ्यावी अशी मागणी खोत यांनी केली. इतकंच नाही तर एका मुख्यमंत्र्यांचा कोतवाल झालेला राजकारणी महाराष्ट्र बघत असल्याचा घणाघात देखील सदाभाऊ खोत यांनी केला. अशोक चव्हाण हे खूप हुशार आहेत त्यांचा 'आदर्श' इतर नेत्यांची घेण्याची गरज असल्याचा खोचक टोला देखील खोत यांनी लगावला. त्याच बरोबर हे सरकार दोन वर्षे अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होतं का असा सवाल देखील खोत यांनी उभा केला.
पांढऱ्या पायाचे सरकार आले अन् आरक्षण रद्द झालं
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. दोन वर्षे हे आरक्षण कोर्टात देखील टिकलं होतं. मात्र हे करंटे आणि पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द झालं. सुप्रीम कोर्टात या सरकारनं आपली बाजू नीट मांडली नाही. वकिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं नाही. विरोधीपक्षांना कधी चर्चेसाठी बोलावलं नाही. मराठा समाजातीलच प्रस्थापित नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. मात्र आता मराठा समाज शांत बसणार नाही. कोर्टाच्या निकालानंतर सर्वात आधी केंद्र सरकार पुन्हा एकदा कोर्टात गेलं. पण अजूनही राज्य सरकार कोर्टात जायला तयार नाही. कारण या सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचं नाही. जे आरक्षणाच्या विरोधात आहे ते प्रस्थापित मराठा नेते आहेत. पण बहुसंख्येनं मराठा समाज गरीब आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे.
अशोक चव्हाण त्यावेळी तुमचे पाय कुणी बांधलेले?
मराठा आरक्षणावरुन नेहमी केंद्र सरकारवर टीका केली जातेय. राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना भाजपनं आरक्षण का दिलं नाही. आता अशोक चव्हाण हात-पाय बांधलेत आणि लढा म्हणत आहेत हे चुकीचं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचं केंद्रात आणि राज्यात 15 वर्षे सरकार होतं. त्यावेळी अशोक चव्हाण तुमचे पाय कुणी बांधले होते हे जरा राज्यातल्या जनतेला कळू दे अशी मागणीच सदाभाऊ खोत यांनी केली.