Russia Ukraine War : रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असतानाच आता रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी देखील युक्रेनमध्ये अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
Russia Ukraine War : सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असतानाच आता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी देखील युक्रेनमध्ये अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्याचबरोबर अमरावती आणि नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी देखील युक्रेनमध्ये अडकले आहेत.हे विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
युक्रेनमध्ये अडकेले 22 विद्यार्थी हे पेण, पनवेल, खारघर येथील आहेत. याबाबत रायगडच्या जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर पालकांनी साधला संपर्क साधला आहे. रशिया-युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेने 40 विद्यार्थी युक्रेनला पाठविले होते. त्यापैकी अहमदनगर शहर व जिल्ह्यातील 18 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. युद्ध परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या एकाच संस्थेमार्फत 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले आहेत. इतरही संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले आहेत. अशातच आता रायगड जिल्ह्यातील देखील 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेले आठ विद्यार्थी
युध्द स्थितीमुळे युक्रेनमध्ये लोक चिंतेत आहेत. तेथील सुपर मार्केट बंद होत चालली आहेत. त्यातील किराणाही संपत चालला आहे. येथे वस्तू महाग मिळत आहेत. तसेच एटीएम बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. भारतीय एटीएम कार्डही बंद पडत चालले आहे अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.
युक्रेनमध्ये अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी अडकलेत
अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी अडकले आहेत. अमरावती जिल्हा प्रशासनाने संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे पाठवली आहे.
विद्यार्थ्यांची नावे
अभिषेक बारब्दे
प्रणव फुसे
साहिल तेलंग
तुषार गंधे
तनिष्क सावंत
ऋषभ गजभिये
स्वराज पुंड
प्रणव भारसाकले
सगळे विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेनला गेले होते
नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलीय. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिलीय. दरम्यान रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये व्यवसाया निमित्त गेलेल्या व अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यात नातेवाईक, पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे. ही सर्व विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तर काही नागरिक व्यवसाय, नोकरीनिमित्त युक्रेनमध्ये आहेत.
दरम्याान, रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी (Volodymyr Zelenskyy) यांनी म्हटले. झेलन्सकी यांनी देशाला संबोधित करणारा एक व्हिडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत रशियाच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती दिली. झेलन्सकी यांनी सांगितले की, रशियाने केलेल्या हल्ल्यात 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 316 जण जखमी आहेत. या युद्धात जगाकडूनही युक्रेनला मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. रशियाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी युक्रेनला एकट सोडण्यात आलं असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या बाजूने लढण्यासाठी कोण उभं आहे? मला एकही देश युक्रेनच्या बाजूने दिसत नाही. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व देण्याची हमी कोण देण्यास तयार आहे? प्रत्येकजण घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: