(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RSS Mohan Bhagwat : हिंदू लोकसंख्येचं टेन्शन, तीन मुलांचं समीकरण! सरसंघचालक नेमकं काय म्हणाले?
RSS Mohan Bhagwat : देशातील लोकसंख्या वाढीचा दर हा 2.1 टक्के इतरा असून त्यापेक्षा कमी झाला तर समाज नष्ट होऊ शकतो असा इशारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुन्हा चर्चेत आहेत. घटत्या लोकसंख्या वाढीच्या दरावरुन सरसंघचालकांनी मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवतांनी म्हटलं आहे. लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला यासाठी भागवतांनी दिलाय. नेमकं काय म्हणाले भागवत पाहूयात.
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं सरसंघचालक मोहन भागवतांनी सुचवलंय. त्यासाठी त्यांनी लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा आधार घेतलाय. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी झाला तर समाज नष्ट होतो असा इशारा मोहन भागवतांनी दिला. नागपुरात कठाळे कुल संमेलनात मोहन भागवत बोलत होते.
या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधीच्या वक्त्यांनी आजकाल अनेक तरुण दांपत्यांना एकही मूल नको असते असा उल्लेख केला होता. त्यावर भागवत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. मोहन भागवतांनी हा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसंच संघ स्वयंसेवकांना द्यावा, असा खोचक सल्ला ओवैसी यांनी दिला.
लोकसंख्येची आकडेवारी काय?
सन 1951 साली हिंदूंची लोकसंख्या होती 84 टक्के तर मुस्लिमांची लोकसंख्या ही 10 टक्के इतकी होती. 2011 साली हिंदू लोकसंख्या ही 80 टक्के इतकी होती. तर मुस्लिम लोकसंख्या ही 14 टक्के इतकी वाढली
सन 1992-93 च्या काळात हिंदूंचा प्रजनन दर हा 3.30 टक्के इतका होता. तर मुस्लिमांचा प्रजनन दर हा 4.41 टक्के इतका होता. त्यानंतर 2019 ते 2021 या काळात हिंदूंचा प्रजनन दर हा 1.94 टक्के इतका होता. तर याच काळात मुस्लिमांचा प्रजनन दर हा 2.36 टक्के इतका होता.
भागवतांच्या या वक्तव्यानंतर मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणाहून अनेक प्रतिक्रिया आल्या. हिंदूचा जन्मदर घटणे धोकादायक असल्याचं मत अनेकांनी बोलून दाखवलं. तर महागाईमुळे सगळ्याच धर्माचे लोक मुलं जन्माला घालताना विचार करतात असंही मत काहींनी व्यक्त केलं.
जन्मदरावरुन सरसंघचालकांनी गेल्या तीन ते चार वर्षात अनेकदा वेळा चिंता व्यक्त केली आहे. आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री चंद्राबाबू आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीसुद्धा ही चिंता व्यक्त केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेल्या व्होट जिहाद या मुद्द्याची सुद्धा आजच्या वक्तव्याला किनार आहे.
ही बातमी वाचा: