Pandharpur : हिंदूंनी तीन मुलांना जन्म द्यावा, मोहन भागवतांचं वक्तव्य; पंढरपुरात आलेले विठ्ठल भक्त म्हणतात, एकीकडे महागाई वाढताना....
RSS Mohan Bhagwat : हिंदूंचा जन्मदर घटला असून त्यांनी तीन मुलांना जन्म द्यावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंच्या घटत्या जन्मदराबाबत केलेल्या वक्तव्यावर पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या विठ्ठल भक्तांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका बाजूला महागाई वाढत असताना एक किंवा दोन मुलांना सांभाळणेच अवघड होत चालल्याचं विठ्ठल भक्त म्हणाले. अशा परिस्थितीत मुलांची संख्या वाढल्यास त्यांच्यासाठी होणारा खर्च कसा करायचा असा प्रश्नही त्यांनी विचारला.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या विठ्ठल भक्तांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ग्रामीण भागात आता हिंदूंचाच नाही तर मुस्लिमांचाही जन्मदर वाढत्या महागाईमुळे घटत चालला असून भागवत यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचा दावा काही जणांनी केला. महिला भाविकांच्या मते, आपली परिस्थिती बघून मुलांची संख्या वाढली तरी हरकत नाही. मात्र या मुलांना व्यवस्थित वेळ देणे आणि त्यांचे करिअर घडवणे अवघड असल्याने या पिढीतल्या महिलांना दोनच मुले योग्य वाटतात.
दुसऱ्या बाजूला हिंदूंनी ही मुलांची संख्या वाढवणे गरजेचे असून ही सांगायची वेळ आज आलेली आहे हे दुर्दैव असल्याचे एका महिला भाविकांनी सांगितले. खरे तर ज्या पद्धतीने हिंदूंचा जन्मदर घटत चालल्याने मुस्लिमांची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि यातूनच उद्या अनेक धोके समोर येऊ शकतात अशी भीती त्या महिला भाविकांनी व्यक्त केली.
तरुणांत मात्र भागवतांच्या वक्तव्यावर सकारात्मक भावना दिसून आली. या महागाईत जर त्यांना मुलांची संख्या वाढवून जगणे शक्य होत असेल तर हिंदूंनी मुलांना जन्माला का घालू नये असा सवाल तरुण भाविक करीत आहेत. तर अशाच रीतीने हिंदूंचा जन्मदर घटत चालला तर 2047 मध्ये भारतात आपण अल्पसंख्यांक बनवून अशी भीती तुळजापूरच्या एका तरुण भाविकाने व्यक्त केली.
मोहन भागवतांच्या भूमिकेला महागाईचा अडसर सर्वसामान्यतून दिसत असला तरी तरुणांना मात्र त्यांची भूमिका योग्य असल्याचे दिसत आहे.
काय म्हणाले मोहन भागवत?
लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी व्हायला नको, अशी चिंता सरसंघाचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली. प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवतांनी सांगितलं. लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांनी यासंदर्भात भाष्य केलं. तर लोकसंख्यावाढीचा दर 2.1 पेक्षा खाली जाणारा असल्यास समाज नष्ट होतो असं भागवतांनी सांगितलं. दरम्यान यावरून असदुद्दीन ओवैसींनी खोचक निशाणा साधला.
ही बातमी वाचा: