Rohit Pawar : माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी नाही, बेताल वक्तव्य केलात तर शांत बसणार नाही; रोहित पवारांचा अजित पवारांना टोला तर संजय शिरसाटांना इशारा
ED Action On Baramati Agro : बारामती अॅग्रोच्या डीलमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नाही, ईडीने जर परवानगी दिली तर मी सर्व कागदपत्रांसह उद्या हे जनतेसमोर जाहीर करेन असं आमदार रोहित पवार म्हणाले.
मुंबई: अनेकांना मी बच्चा वाटतो, लहान वाटतो, पण या लहान कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या मागे बापमाणूस आहे असं वक्तव्य करत आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवारांना टोला लगावला. बापाला बाप म्हणतो, त्याचं वय काढत नाही असंही ते म्हणाले. माझी केस ही पळून जाण्यासारख्या लोकांसारखी नाही, त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांनी सांभाळून राहावं, बेताल वक्तव्य कराल तर कायदेशीर कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिला. ईडीच्या 12 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार रोहित पवार म्हणाले की, एक कार्यकर्ता म्हणून पवार साहेब यांची प्रेरणा कायम सोबत राहणार. माझ्या वयाचं असताना पवार साहेब मुख्यमंत्री होते. आता सर्वात कमी वयाच्या लोकप्रतिनिधीवर ईडीने कारवाई केली असेल तर तो मी आहे.
माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी नाही (Rohit Pawar PC On ED Action)
संजय शिरसाट यांच्यासारख्या नेत्यांना मंत्री होता येत नाही, त्यामुळे ते आमच्यावर बेताल वक्तव्य करतात, यापुढे त्यांनी टीका करताना खबरदारी घ्यावी असा इशारा आमदार रोहित पवारांनी दिला. ते म्हणाले की, यापुढे आमच्यावर राजकीय वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही, कायदेशीर कारवाई करणार. माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी नाही. त्यामुळे त्यांना जर वाटत असेल की ते बोलतील आणि मी शांत बसेन तर त्यावर योग्य ते उत्तर देईन, हवेत लढणाऱ्या आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना इशारा देतो.
ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत होते, मी माझं काम करत होतो. पण जनतेला विचारला तर ते सांगतील की माझ्यावर कारवाई केली त्यामागे राजकारण आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर या अशा प्रकारच्या कारवाई होत राहतात असं रोहित पवार म्हणाले.
फक्त 15 मिनिटांचा जेवणाचा ब्रेक, इतर वेळी नुसता प्रश्नांचा भडिमार
गेल्या 12 तासांमध्ये 15 मिनिटे सोडली तर साडेअकरा किंवा पावणे बारा तास माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला जात होता असं रोहित पवार म्हणाले. पण पवार साहेबांनी दिलेल्या पुस्तकावर यशवंतराव चव्हाणांचा फोटो होता. तर सुप्रियाताईंनी दिलेल्या संविधानाच्या पुस्तकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. या दोन फोटोंकडे पाहून मला सलग पावणे बारा तास उत्तरं देण्याची उर्जा मिळाली असं ते म्हणाले.
ही बातमी वाचा: