(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली आहे; रोहिणी खडसेंची अजित पवार गटावर जहरी टीका
Rohini Khadse : शरद पवार हे आमची एकमेव ताकद आणि पक्ष आहे. पवार साहेब आमच्या सोबत असल्याने, लढेंगे भी और जितेंगे भी, असे खडसे म्हणाल्यात.
मुंबई : जन्मदात्या बापाचं नाव लावणं अपेक्षित असतांना राजकारणात मात्र, बाप बदलण्याची नवीन पद्धत आली असल्याची टीका शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी अजित दादा गटावर केली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी (NCP) पक्षाबाबत निवडणूक आयोगाने (Election Commission) निकाल दिला असून, पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहेत. यावरून रोहिणी खडसे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.
दरम्यान पुढे बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्यात की, “ खरे पाहिलं तर असा निकाल येणे अपेक्षित होते. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष वाढवला, त्या पक्षाचे चिन्ह काढण्यात आलं. त्यामुळे हे माहीत होते की, आपल्या पक्षाचंही चिन्ह काढण्यात येईल. या निकालामुळे लोकशाही आता महाराष्ट्रात आणि भारतात शिल्लक राहिलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार हे आमची एकमेव ताकद आणि पक्ष आहे. पवार साहेब आमच्या सोबत असल्याने, लढेंगे भी और जितेंगे भी," असे खडसे म्हणाल्यात.
जनतेचा संतोष मतदानाच्या माध्यमातून बाहेर येणार...
सुप्रियाताईंनी सांगितले त्याप्रमाणे या सर्व निर्णयात अदृश्य शक्ती आहेच. मात्र, देशभरात जनतेमध्ये जो संतोष आहे तो मतदानाच्या माध्यमातून बाहेर येणार आहे. जन्म देणाऱ्या बापाचं नाव लागलं पाहिजे, जन्म देणाऱ्या बापाचाच हा पक्ष असायला हवा, मात्र बाप बदलण्याची ही नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप....
निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिल्यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून पक्ष चोरल्याचा आरोप केला जात आहे. तर, खरी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभेकरतांना पाहायला मिळत आहे.
घड्याळ मनगटावरून पाकीटमारासारखं चोरली...
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. "निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष असं नावं आम्हाला दिलं आहे. यांनी घड्याळ मनगटावरून पाकीटमारासारखं चोरलं. पण आमचं मनगट मजबूत आहे. आमचा पक्ष, आमचं नावं शरद पवार हे मी आधीच सांगत होतो, असे आव्हाड म्हणाले. आयोगाचा निर्णय दुटप्पी, संभ्रम निर्माण करणारा आहे. हा पक्ष बळकट करण्याचे कोणाचे प्रयत्न होते? हा पक्ष कोणी मोठा केला? यावर धडान्त खोटं निवडणूक आयोग बोललय. निवडणूक आयोग कटपुतली झालेय, असेही आव्हाड म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :