(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाच्या काळात होणाऱ्या सिद्धेश्वरांच्या यात्रेवर निर्बंध, सर्वसामान्यांसाठी मंदिर राहणार बंद
12 जानेवारी पासून 16 जानेवारी पर्यंत सिद्धेश्वरांच्या यात्रेच्या प्रमुख धार्मिक विधी पार पडत असतात. मात्र या धार्मिक विधींवर देखील प्रशासनातर्फे मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना यात्रा काळात मंदिरात प्रवेश बंद असणार आहे.
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या यात्रेसाठी मंदिर समितीने पाठवलेल्या प्रस्तावावरुन आज रात्री उशीरा प्रशासनाने आपले आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध मर्यादा घालून धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना यात्रा काळात मंदिरात प्रवेश बंद असणार आहे.
12 जानेवारी पासून 16 जानेवारी पर्यंत सिद्धेश्वरांच्या यात्रेच्या प्रमुख धार्मिक विधी पार पडत असतात. मात्र या धार्मिक विधींवर देखील प्रशासनातर्फे मर्यादा घालण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत पालिकेच्या आयुक्तांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. विविध राजकीय मंडळीनी यात्रेसाठी परवानगी मागताना 1 हजार लोकांना उपस्थित राहता यावे यासाठी मागणी केली होती. मात्र राजकीय मंडळीच्या या मागणीला प्रशासनाने फेटाळत यात्रेवर मर्यादा घातल्या आहेत.
12 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता हिरेहब्बू वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पुजा होते. त्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेतील प्रमुख सात काठ्यांना यावेळी सरकारतर्फे आहेर देखील दिला जातो. ब्रिटीश काळापासून हा मान चालत आलेला आहे. त्यानंतर नंदीध्वजांचा तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा केली जाते. मानकऱ्यांना विड्याचा मान दिला जातो. त्यानंतर 68 लिंगास यन्नीमज्जन प्रारंभ होतो. यंदा मात्र या यन्नीमज्जन या धार्मिक विधीच्या मिरवणूकीस परवानगी देता येणार नाही. असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी जारी केले आहेत. मात्र परंपरा जपण्याच्या दृष्टीने 11 तारखेलाच मानाचे 7 ही नंदीध्वज अगोदरच मंदिर परिसरात ठेवून तेथेच सजविण्यात यावे. केवळ मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात यावी.
प्रत्येक नंदीध्वजासमवेत 5 असे एकूण 35 व्यक्ती तसेच त्यांच्यासोबत इतर 15 पूजारी आणि मानकरी असे मिळून एकूण 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. या व्यक्तींची यादी समितीने दोन दिवस आधी पोलिस विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर यन्नीमंजन या विधीसाठी 68 लिंगास योगदंडासह तैलमर्दन करणेकामी योगदंडधार आणि 7 ध्वजाचे प्रत्येकी 1 मानकरी यांना परवानगी देण्याती आली आहे.
यात्रेचा सर्वात महत्वाचा विधी असलेल्या अक्षता सोहळ्यासाठी देखील मानकरी, पुजारी, नंदीध्वजधारक अशा केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. दरवर्षी या विधीसाठी राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून लाखो भाविक उपस्थित असतात. मात्र या अक्षता सोहळ्यासाठी केवळ 50 लोकांना उपस्थित राहता येणार आहे. परवानगीबाबत प्रशासनामार्फत ओळखपत्र देखील देण्यात येणार आहेत. यात्रेचा प्रमुख आकर्षण असलेल्या शोभेचे दारुकाम कार्यक्रम दरवर्षी 15 जानेवारी रोजी पार पडत असतात. यंदा मात्र शोभेच्या दारुकामासाठी प्रशासनाने परवानगी पूर्णपणे नाकारली आहे. तसेच यात्रेचा शेवटचा दिवस असलेल्या कप्पडकळी कार्यक्रम मिरवणुकीस देखील प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. नंदीध्वजाची नगर प्रदक्षिणा मिरवणूक न काढता प्रतिकात्मक स्वरुपात सिद्धरामेश्वर योगदंड घेऊन मंदिर परिसरात पार पाडावेत अशा सूचना सोलापूर महानगर पालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत.
दरम्यान यात्रा कालावधीत सिद्धेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत. तर अत्यावश्यक दुकाने वगळता करमणुकीची आणि मनोरंजन साधनांची दुकाने देखील बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर पंरपरेनुसार चालत आलेले सर्व नित्योपचार देवस्थान समिती मार्फत करण्यात यावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच मंदिर परिसरात कोणीही भक्त येणार नाही याकरिता देवस्थान समितीने खासगी सुरक्षा रक्षक नेमावे. अशा सूचना देखील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. तर भाविकांना दर्शन घेता यावेत यासाठी धार्मिक विधी, नंदीध्वजाची पुजा, मिरवणुक, आरती, महापूजा यांचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावरुन करण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी एबीपी माझासोबत फोनवरून बोलताना नाराजी व्यक्त केली. "धार्मिक विधी पार पाडण्यासाठी प्रशासन सांगत आहे. मात्र धार्मिक विधीसाठी केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सर्व मानकऱ्यांना देखील संधी देता येत नाही. उद्या या संदर्भात मानकऱ्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल." अशी माहिती यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.
वास्तविक कोरोनाच्या काळात राज्यभरातील कोणत्याच उत्सव आणि यात्रांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शेकडो वर्षांची परंपरा खंडित होऊ नये या साठी पंचकमिटीने आपला प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. तर यात्रेची परवानगी मिळवण्यासाठी करमाळाचे आमदार संजय शिंदे, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये राजकीय श्रेयवादाची स्पर्धा देखील पाहायला मिळाली. दोघांनीही यात्रेला किमान 1 हजार लोकांना परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न केले. आयुक्त, जिल्हाधिकारीपासून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत हा विषय नेत अगदी प्रतिष्ठेचा मुद्दा तयार करण्यात आला होता. मात्र सर्वांच्या मागण्या फेटाळत विभागीय आयुक्तांनी यात्रेवर निर्बंध घालण्याचा निर्णय अखेरीस घेतला आहे.