राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री
विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे. त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 'ब्रेक दि चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
नियम मोडले जात असतील तर स्थानिक प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावे
जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे. त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असंही ते म्हणाले.
पावसाळ्यापूर्वी जम्बो सुविधा तपासा, फायर ऑडिट करून घ्या
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता , मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. कोरोनाचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे.
ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिवीरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा , वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा ऑडिट त्वरेने पूर्ण करून घ्यावे. यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.