(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रत्नागिरीत जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवले सक्तीच्या रजेवर; औषध खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका!
कोरोनाच्या काळात झालेल्या औषध खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
रत्नागिरी : कोरोना रूग्णांचा आकडा हा रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा हा 580वर पोहोचला असून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे 70 टक्के पेक्षा देखील जास्त आहे. दरम्यान, अशा काळात आता रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात झालेल्या औषध खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बोल्डे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केली आहे.
बोल्डे यांच्यासह आणखी देखील काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवाय, यासाऱ्या औषध खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कमिटीची देखील स्थापना करण्यात आली असून कमिटीचा अहवाल नेमका काय येतो? हे आता पाहावं लागणार आहे.मागील काही दिवसांबाबत या औषध खरेदी व्यवहाराबाबत रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात येत होती. अखेर या साऱ्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली असून जिल्हा शल्य चिकित्सक बोल्डे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.