एक्स्प्लोर
एक-दोन नव्हे, 300 भाकड गायी सांभाळणारा रत्नागिरीचा अवलिया
चिपळूणच्या लोटे गावच्या माळरानावर भगवान कोकरे आपल्या गोधानसह वावरतो. त्याच्या आजूबाजूला वावरणारं गोधन पाहिलं की मन प्रसन्न होतं, एक-दोन नाही, तर तब्बल तीनशेहून जास्त गायी भगवान लोकरेजवळ आहेत. पण या गायी त्याने विकत घेतलेल्या नाहीत.
रत्नागिरी : घराच्या पडवीत किंवा गोठ्यात बांधलेली दोन-चार जनावरं पाळणंही लोकांना आता कठीण जातं. पण रत्नागिरी जिल्ह्यात असा एक अवलिया आहे, जो थोड्या-थोडक्या नाही तर तब्ब्ल 300 हून अधिक गायी सांभाळत आहे. विशेष म्हणजे या गायी त्यांच्या स्वतःच्या नसून इतरांनी नाकारलेल्या आहेत.
सांभाळायला जड झालेल्या किंवा रस्ता अपघातात जखमी झालेल्या गायी भगवान कोकरे सांभाळतात. गोधनामुळे तो श्रीमंत झाला खरा, पण या तीनशे गाईंना रोज काय खायला घालायचं, त्यांचं पालनपोषण कसं करायचं, या विचारानं तो तितकाच अस्वस्थही आहे.
चिपळूणच्या लोटे गावच्या माळरानावर भगवान कोकरे आपल्या गोधानसह वावरतो. त्याच्या आजूबाजूला वावरणारं गोधन पाहिलं की मन प्रसन्न होतं, एक-दोन नाही, तर तब्बल तीनशेहून जास्त गायी भगवान लोकरेजवळ आहेत. पण या गायी त्याने विकत घेतलेल्या नाहीत.
ज्यांना इतरांनी किंबहुना त्यांच्याच मालकांनी नाकारलं आहे, त्या गायी भगवान लोकरेजवळ आल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर कत्तलखान्यात जाणारा ट्रक लोकांनी पकडला. पण तांत्रिक अडचणीमुळे या गायी पुन्हा कत्तलखान्याकडेच जाणार, हे जेव्हा स्पष्ट झालं, तेव्हा मागचा-पुढचा विचार न करता कोकरेने त्याची जबाबदारी उचलली आणि इथूनच सुरु झाला हा गोसंचय.
रस्त्यात अपघातात जखमी झालेल्या मरणासन्न अवस्थेत गेलेल्या गायी कोणीच पाहत नाही, म्हणून कोकरेच्या आवारात येऊ लागल्या. यातूनच मग स्थानिक पातळीवर कुठेही जनावर जखमी झालं, की त्याचं पालकत्व स्वीकारणारा माणूस म्हणून त्याची ओळखच बनली. कोकरे जनावरांना जीवापाड जपतो अशी ओळख निर्माण झाल्याने कोकणात गावातील अनेक शेतकरी आर्थिक स्थितीने गायी-गुरं सांभाळणं झेपत नसल्याने कोकरेकडे आणून देऊ लागली.
एक-एक करत गायींची संख्या तीनशेच्या पार गेली आहे. चिपळुणात स्वतःचं एक दुकान आणि प्रवचनाची आवड
असलेला कोकरे दुकान आणि प्रवचनातून होणाऱ्या अर्थार्जनातूनच हा सारा व्याप सांभाळतो. कोकरेच्या या कामात त्याला मदत करण्यासाठी आता या परिसरातील अनेक सुशिक्षित तरुण मंडळी पुढे येत आहेत. आता ही गोशाळा पहायला येणारी मंडळी मदत करतात पण ती अगदीच तुटपुंजी असते. गायींचा चारा-औषध उपचार यासाठी या मंडळींना दारोदार भटकावंच लागतं.
सरकारने गोवंश हत्येबाबत कायदा केला पण भाकड झालेल्या- लोकांनी नाकारलेल्या या गायींचं काय? त्यांचं संगोपन कोणी आणि कसं करायचं ? याबाबत सरकार पातळीवर पूर्ण उदासीनता आहे. कोकरेंच्या आवारात असलेल्या सर्वाधिक गायी या शेतकऱ्यांनी आता गुरं सांभाळणं परवडत नसल्याने त्यांच्याकडे आणून सोडली आहेत. कोणाला तरी विकली तर कत्तल खान्यात जातील त्यापेक्षा कोकरेंकडे जिवंत राहतील म्हणून आणून सोडली जात आहेत केवळ कामाचं कौतुक करुन कोरड्या शुभेच्छांनी आपली जनावर सोडून जात आहेत. राजकीय पक्ष, नेते कोरडी सहानुभूती दाखवतात, पण प्रत्यक्ष मदत होतच नाही, हा कोकरे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मंडळींचा आजवरचा अनुभव आहे.
इथे आलेली बहुतांश जनावरे जखमी असतात. कोकरेंच्या आवारात अनेक आंधळी जनावरे आहेत, तर काही पायाने पूर्णतः अधू... काहींना त्वचा रोग झाले आहेत. त्या सगळ्यांवर इथे उपचार होत आहेत. 300 हून अधिक गायी सांभाळण्याचं शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भगवान कोकरे यांच्याकडे स्वतःची जमीन नाही.
लोटे औद्योगिक वसाहतीच्या ग्रीन झोनमध्ये ते हे सारं गोधन सांभाळतात. यामुळे इथे विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे शेण-गोमूत्र यावर प्रक्रिया करुन त्यातूनही अर्थार्जन करता येत नाही. पावसाळ्यात कोकणातल्या हिरव्या चाऱ्यावर दिवस जातात पण उन्हाळ्यात समस्यांचा डोंगर उभा राहतो. जमा झालेल्या प्रचंड गोधनाची ही श्रीमंती आहे, पण त्यांना जगवायचं कसं, ही भ्रांत त्याला सतत सतावत आहे.
भगवान कोकरेला मदत करण्यासाठी संपर्क :
भगवान कोकरे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत,
एम आय डी सी लोटे,
तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
संपर्क 9921487148, 7276270910
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement