Raosaheb Danve : 'दाजी'ज किचन; रावसाहेब दानवेंनी चॅलेंज स्वीकारलं अन् थापली चंद्रासारखी गोल भाकरी
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी भाकरी करण्याचं चॅलेंज स्वीकरलं आणि चक्क चंद्रासारखी गोल भाकरी थापली. एकाद्या सुगरणीलाही लाजवेल अशा प्रकारची भाकरी त्यांनी केली.
जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची कथाच न्यारी. कधी त्यांच्या भाषणाची चर्चा तर कधी त्यांच्या स्टाईलची चर्चा, त्यांचे कार्यकर्तेच नव्हे तर राज्यातले अनेक लोक त्यांच्या या स्टाईलचे चाहते. आपल्या शिवराळ भाषणानं समोरच्याला खदखदून हसवणारे रावसाहेब दानवे हे राजकारणातलेही 'रावसाहेब' आहेत. पण त्यांचं आणखी एक रुप आता समोर आलंय. रावसाहेब दानवेंनी जेवण बनवण्याचं चॅलेंज् स्वीकारलं आणि चक्क चंद्रासारखी गोल आणि करकरीत भाजलेली भाकरी थापली. ग्रामीण भागातल्या आया-बायांना ज्या प्रकारे भाकरी थापता येते अगदी त्याच प्रकारे दानवेंनी भाकरी थापून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
आपलं शेतकरी कुटुंब असल्याचं सांगत रावसाहेब दानवे म्हणाले की, "शाळेत असताना, सातवीत असल्यापासूनच आपण घरी स्वयंपाक करत होतं. आताही अनेकदा आपण स्वत: स्वयंपाक करतोय. मी प्रॅक्टिकल माणूस आहे. जेव्हा आपलं लग्न झालं होतं त्यावेळी मी चहा स्वत: करायचो आणि बायकोला द्यायचो."
आपल्याला स्वयंपाक करता येतं असं, आपण थापा मारत नाही असं सांगत रावसाहेब दानवे स्वत: स्वयंपाक करायला उठले. हा, पण ते भाकरी करायला उठताना मात्र गंमतीने म्हणाले की, "असं नाही की मला बायकोने भाकरी करायला लावली. लोक उद्या काहीही म्हणू शकतील, म्हणून आधीच हे स्पष्ट केलं."
रावसाहेब दानवेंनी भाकरीचं पीठ घेतलं आण ते मळलं. त्याची भाकरी अशी कौशल्याने थापली, करकरीत भाजली की कोणीतरी केंद्रीय मंत्री किंवा पुरुष व्यक्ती इतक्या चांगल्या पद्धतीने हे काम करु शकतो यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. पण रावसाहेब दानवेंनी हे करुन दाखवलं.
रावसाहेब दानवेंनी भाकरी इतक्या चांगल्या पद्धतीने आणि चंद्रासारखी गोल थापली की कोण त्या भाकरीला नावं ठेवूच शकणार नाही. ती भाकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने भाजली होती.
केंद्रीय रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की मी राजकारणात यशस्वी झालो ते चॅलेंज स्वीकारून. आताही भाकरी केली तेही चॅलेन्ज स्वीकारूनच. आपण पुरणाच्या पोळ्या खूप चांगल्या प्रकारे करु शकतो, तसेच बेसन देखील चांगल्या चवीचं करु शकतो असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :