चर्चित 'रामटेक'ला मंत्री मिळाला, बंगल्यात आतापर्यंत कोण कोण राहिलं? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली?
Ramtek bungalow : रामटेक बंगल्याबाबात अनेक समज-गैरसमज आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हा बंगला दीपक केसरकर यांना मिळाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात रामटेक बंगल्याची चर्चा रंगली आहे.
Ramtek bungalow : मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला.. सी फेसिंग. या बंगल्यासाठी गेल्या काही वर्षांपर्यंत मंत्र्यांमध्ये भांडणं लागायची. पण भुजबळांना तुरुंगवास झाला आणि खडसेंचं मंत्रिपद गेल्याने 'रामटेक' म्हटलं की मंत्री कानावर हात ठेवत होते. एकनाथ खडसे यांच्यानंतर तिथे पर्यटन खात्याचे माजी मंत्री जयकुमार रावल राहिले. त्यांच्याही मागे चौकशीच्या ससेमीरा लागेल, अशी चर्चा रंगली होती. रामटेक बंगल्याबाबात अनेक समज-गैरसमज अद्याप आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हा बंगला आता दीपक केसरकर यांना मिळाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात रामटेक बंगल्याची चर्चा रंगली आहे. पाहूयात रामटेक बंगल्याबाबत आतापर्यंत काय काय झालं?
1975 च्या आणीबाणीनंतर ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई गंभीर आजारी होते. या काळात त्यांचं वास्तव्य शरद पवारांच्या याच रामटेक बंगल्यात होतं. दलवाईंनी मृत्यूनंतर आपलं दफन नव्हे तर दहन करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली. पण इस्लाममध्ये पार्थिवाचं दहन करण्यास मनाई आहे. त्यामुळे शरद पवारांना हमीद दलवाईंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्या वादाचा सामना करावा लागला. त्या काळातही पवारांचं वास्तव्य रामटेकमध्येच होतं..
1978 साली वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदची स्थापना केली. दादांचं सरकार पाडणार नाही, म्हणता म्हणता पवारांनी याच रामटेक बंगल्यातून सरकारला धक्क्याला लावलं आणि त्यावेळीही रामटेक बंगला चर्चेत होता. त्यामुळेच रामटेक बंगला लाभतो, अशी धारणा तयार झाली. 1995 साली युतीचं सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी रामटेक बंगला हट्टाने मागून घेतला. पण मुंडेंना बंगला किती लाभला हा संशोधनाचा विषय आहे. कारण याच काळात मुंडेंचे एका नर्तिकेशी जवळचे संबंध असल्याचा आरोप झाला. ज्यावरुन आख्ख्या राज्यात राळ उडाली आणि मुख्यमंत्री असलेल्या जोशी सरांसोबतचं शीतयुद्ध मुंडेंना चार वर्ष पुरलं. रामटेक लाभतो म्हणता म्हणता 1999 ला मुंडेंना सत्ता सोडावी लागली. आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ रामटेक बंगल्यात आले उपमुख्यमंत्री म्हणून. पण तेलगी प्रकरणाने डोकं वर काढलं आणि भुजबळांना राजीनामा द्यावा लागला. अर्थात त्यातून भुजबळ सहीसलामत सुटले खरे, पण तोवर त्यांना बराच त्रास सहन करावा लागला.
विलासराव देशमुख रामटेकमध्ये राहत असताना त्यांना लातूरमधून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना 1995 विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ते रामटेकमधून बाहेर निघाले खरे.. पण 1996 मध्ये झालेल्या विधानपरिषदेत त्यांचा अर्ध्या मताने पराभव झाला. विलासराव देशमुख यांना राजकीय पुनर्वसन करण्यासाठी चार वर्ष लागली.
सत्ता गेल्यानंतर भुजबळांची जागा एकनाथ खडसेंनी घेतली. मुख्यमंत्र्यांनंतर खडसेच सरकारमधील वजनदार मंत्री होते. पण दीड वर्षातच खडसेंच्या मागेही भ्रष्टाचाराच्या आरोपांचं भूत लागलं. खडसेंनी यातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण रामटेक खडसेंचं मंत्रिपद खाऊनच शांत झाला. सूत्रांच्या माहितीनुसार खडसेंनी अगदी काहीच दिवसांपूर्वी रामटेकवर वास्तूशास्त्राची पूजाही घातली होती, पण त्याचा फायदा काही झाला नाही.
खरंतर शरद पवारांनंतर रामटेक कुणाला लाभला? हा संशोधनाचाच विषय आहे. तरीही रामटेकसाठी मंत्र्यांचा आग्रह मात्र कायम आहे. पण खडसेंचं मंत्रिपद गेल्यानंतर भाजपमधील मंत्री रामटेकच्या रेसमध्ये आमचं नाव चालवू नका, म्हणून आग्रह करु लागले आहेत. अर्थात अशा शुभ-अशुभावर विश्वास ठेवायचा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता हा बंगला मंत्री दीपक केसरकर यांना मिळाला आहे.