(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eid 2022 : 'ईश्वर-अल्लाह सब एक'; बुलढाण्यातील 95 वर्षीय कुसुमबाई दीक्षित 55 वर्षांपासून करतात रोजे
Ramadan Eid 2022 Eid al-Fitr : मेहकर येथील कुसुमबाई दीक्षित या 95 वर्षीय आजीबाई वयाच्या 40 वर्षांपासून म्हणजे तब्बल 55 वर्षांपासून पवित्र रमजान महिन्यातील शेवटचे तीन दिवस रोजा करतात.
Ramadan Eid 2022 Eid al-Fitr : रमजान हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र महिना. या महिन्यात बहुतांश मुस्लिम बांधव रोजे करून अल्लाह प्रति आपली भावना व्यक्त करतात. मात्र मेहकर येथील कुसुमबाई दीक्षित या 95 वर्षीय आजीबाई वयाच्या 40 वर्षांपासून म्हणजे तब्बल 55 वर्षांपासून पवित्र रमजान महिन्यातील शेवटचे तीन दिवस कडकडीत रोजा करून राम रहीम, ईश्वर अल्लाह एकच असल्याचं सांगतात. इतकंच नाही तर त्या या काळात मौन व्रतही करतात. इतक्या वर्षांपासून रोजे करणाऱ्या त्या शहरातील एकमेव महिला असल्याचं लोक आवर्जून सांगतात. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतिक असलेल्या या आजीबाई परिसरात चर्चेचा विषय बनल्या आहेत.
भारत देश हा विविध धर्म, समाज आणि परंपरेने नटलेला आहे. येथे प्रत्येक धर्माचा सन्मान करून सर्वजण एकत्र राहतात. हिंदू मुस्लिम एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होतात. असेच एकतेचे सामाजिक सलोख्याचे उदाहरण मेहकर शहरातील सराफा लाइनमधील राजपूत गल्लीत राहणाऱ्या 95 वर्षीय कुसुमबाई दीक्षित आजी. त्यांनी मागील 55 वर्षापासून न चुकता पवित्र रमजान महिन्यातील शेवटचे ज्यांना मोठे रोजे (उपवास) म्हटलं जाते असे रोजे(उपवास) अखंडपणे केले आहेत.
शेवटचे तीन रोजे म्हणजे पवित्र असतात
रमजान हा मुस्लिम बांधवासाठी पवित्र महीना या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव पूर्ण महीनाभर रोजे(उपवास) ठेवत असतात आणि अल्लाहची उपासना करतात. कुसुमबाई दीक्षित मागील 55 वर्षापासून रमजान महिन्यातिल पवित्र रोजे(उपवास) न चुकता ठेवत आहेत. कुसुमबाई यांनी वयाच्या 40 व्या वर्षापासून रमजा न महिन्यातिल शेवटचे मोठे 3 रोजे ठेवण्याची सुरुवात केली. एक आस्था म्हणून कुसुमबाई दीक्षित यांनी सुरु केलेले हे मोठे रोजे ठेवण्याचे व्रत त्यांनी अखंडपणे सुरु ठेवले आहे.
कुसुमबाई म्हणतात राम-रहीम, ईश्वर-अल्लाह सब एक ही हैं, उसकी नजर में हम सब मानव हैं. यासाठी कुठे भेदभाव न करता सर्वांनी एकत्रित राहावे, असा मानस कुसुमबाई व्यक्त करतात. रोजांबद्दल विचारल्यावर त्या म्हणतात रोजे मला संयम, शिस्त,एकवचन व नवीन ऊर्जा देऊन जातात. त्यामुळे मी रोजे दरवर्षी न चुकता ठेवते. 95 वर्ष वय असून सुद्धा दीक्षित आजी रोजे ठेवतात हे खरंतर चमत्कारीकच आहे परंतु इच्छाशक्ति असली की काहीही साध्य होतं अशी शिकवण आपल्या सर्वधर्म समभाव कृतीतून दीक्षित आजी देऊन जातात.
दीक्षित आजीचे चिरंजीव व्यवसायिक श्याम दीक्षित ही आपल्या आईच्या या कार्यात त्यांना सहकार्य करतात. सकाळी उठून ते व त्यांची पत्नी हे रोजा ठेवण्यासाठी आईची व्यवस्था करतात. 95 वर्षीय आजीच्या रोजे ठेवण्याची कुतूहलाने शहरात चर्चा होत आहे.
आजीबाईंच्या घरच्यांनाही अभिमान..!
माझ्या आईचे वय 95 वर्षे असून गत 55 वर्षांपासून मोठे रोजे करत आहे. आईने आम्हाला सांगितले आहे जोपर्यंत मी जिवंत राहील तोपर्यंत मी पवित्र रोजा,सोमवार, गुरुवार, पंधरवाडी एकादशी हे उपवास करणार आहे. माझ्यी आई 12 महिन्यातून 4 महीने मौन व्रत करत असते. वयाच्या 20 वर्षांपासून केवळ एक टाइम जेवण करत आहे. आईला या उपवासातून एक वेगळी ऊर्जा मिळते असं श्याम दीक्षित सांगतात.