Sambhajiraje : वडिलांचा आदर करतो पण शिवरायांना स्मरुन सांगतो, मी खरं तेच बोललोय; शाहू महाराजांच्या खड्या बोलानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया
Shahu Maharaj : संभाजीराजेंना उमेदवारी डावलली याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी शब्द कसा फिरवला असं शाहू महाराजांनी बोलत संभाजीराजेंना खडे बोल सुनावले होते.
कोल्हापूर: संभाजीराजेंनी जरी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी या विषयावरून सुरू असलेला वाद काही थांबण्याची चिन्हं नाहीत. आता हा वाद थेट शाहू महाराजांच्या घराण्यात गेला असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतो, पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोललो ते सत्यच होतं असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे. आपल्या वडिलांचा आदर करत असून ते काही बोलले त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही असंही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 28, 2022
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.
संभाजीराजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीसाठी सहावा उमेदवार म्हणून संजय पवार यांना संधी दिली. त्यानंतर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज शाहू महाराजांनी आज त्यांचा दावा खोडून काढला. संभाजीराजेंना उमेदवारी दिली नाही याच्याशी छत्रपती घराण्याचा काही संबंध नसल्याचं शाहू महाराजांनी सांगितलं होतं.
काय म्हणाले होते शाहू महाराज?
संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांवर शब्द फिरवण्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शाह महाराज म्हणाले होते की, "छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा यामध्ये प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. आमच्यामध्ये काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता, पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील त्यांनी चर्चा केली नव्हती. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं."