Majha Katta : 'शेतकरी अडाणी राहिला तर शेती कशी परवडेल', कृषिरत्न राजेंद्र पवारांसोबत शेतीमातीच्या गप्पा
'पवार' परिवारात एक नाव असं आहे राजकारणापासून दूर राहून शेतीत रमणारे राजेंद्र पवार यांची एक वेगळी ओळख आहे. राजेंद्र पवार यांच्याशी माझा कट्टा कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी शेती, माती, पिकं, बारामती पॅटर्न यासह शेतीतील नवनवीन प्रयोगांवर अनुभवांसह त्यांनी उदाहरणं दिली.
मुंबई : राजकारणात 'पवार' नाव घेताच आपल्यासमोर राजकारण उभं राहतं. मात्र या पवार परिवारात एक नाव असं आहे जे राजकारणापासून दूर आहे. ते म्हणजे राजेंद्र पवार. शेतीत रमणारे राजेंद्र पवार यांची एक वेगळी ओळख आहे. राजेंद्र पवार यांच्याशी माझा कट्टा कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी शेती, माती, पिकं, बारामती पॅटर्न यासह शेतीतील नवनवीन प्रयोगांवर अनुभवांसह त्यांनी उदाहरणं दिली.
राजेंद्र पवार म्हणाले की, जो शेतकरी शेतीवर प्रेम करतो, तो यशस्वी होतो असं ते म्हणाले. आधी शिक्षणाप्रमाणं नोकऱ्या दिल्या जायच्या. काही न शिकलेल्या लोकांना शेतीच्या कामाला लावलं जायचं. पूर्वीसारखं आता चालत नाही. आता शेतीत बचत करणं फार गरजेचं आहे. जमिनीत काय चाललंय हे आपल्याला कळलं पाहिजे. जमिन जीवंत आहे पण जमिनीशी कसं खेळायचं हे शिकणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी मायक्रो बायोलॉजी व्यवस्थित शिकवली जात नाही. शेतीसाठी आपल्याला बॉटनी जमली पाहिजे. शेतीला औषधं कोणती द्यायची यासाठी आपल्या केमिस्ट्री देखील कळली पाहिजे. आजचा शेतकरी अडाणी राहिला तर त्याला शेती कशी परवडेल. शिवाय त्याने त्यात कष्ट केलं पाहिजे. कष्ट केल्याशिवाय त्याला शेती परवडणार नाही, असं राजेंद्र पवार म्हणाले. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान स्वीकारायला पाहिजे. आपल्याकडं अर्धं स्वीकारतात, अर्ध स्वीकारलं जात नाही, असं राजेंद्र पवार म्हणाले.
कृषिरत्न राजेंद्र पवारांना त्यांची कोणती ओळख आवडते? माझा कट्ट्यावर सांगितलं उत्तर
यावेळी त्यांना आप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव, शरद पवारांचे पुतणे, अजित पवार-सुप्रिया सुळे यांचे चुलतभाऊ की आमदार रोहित पवारांचे वडिल आणि शेतीमधील एक पंडित यांपैकी कुठली ओळख तुम्हाला आवडते? असा सवाल राजेंद्र पवार यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की, मी राजेंद्र पवार असल्याची ओळख मला आवडते.
राजेंद्र पवार म्हणाले की, पुरस्कारासाठी आम्ही कुणीच काम करत नाहीत. पुरस्काराचं फार मोठं अवडंबर करत नाहीत. शेतीशी आमचा कायम संबंध आलेला आहे. मला आईमुळं शेतीची विशेष आवड लागली. आप्पासाहेबांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आमची आई वारली त्याच्या दुसऱ्या दिवशी 100 शेतकऱ्यांना घेऊन चितळ्यांकडे जायचं होतं. त्यावेळी वडिलांनी विचारलं तू जातो की मी जाऊ त्यावेळी मी त्यांना कसं म्हणणार तुम्ही जा. 36 तासही झाले नव्हते त्यावेळी मी 100 शेतकऱ्यांना घेऊन चितळेंकडे गेलो, असे आमच्यावर संस्कार आहेत, असा अनुभव राजेंद्र पवारांनी सांगितला.