Raj Thackeray : बहुचर्चित सभेसाठी राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल, मनसैनिकांकडून जंगी स्वागत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) औरंगाबादमध्ये पोहोचले आहे. औरंगाबादमध्ये उद्या त्यांची जाहीर सभा होणार आहे. औरंगाबादमध्ये पोहोचल्यानंतर मनसैनिकांनी राज ठाकरे यांचे जंगी स्वागत केले.
Raj Thackeray : मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्याच्या औरंगाबादेमध्ये होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये पोहोचले असून मनसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. ढोल आणि ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.
राज्यातील सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची उद्याची औरंगाबाद येथील सभा चर्चेत आहे. राज ठाकरे यांच्या या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याबरोबरच राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून सभेच्या प्रचारासाठी भोंगे लावलेल्या रिक्षांमार्फत शहरात या सभेचा प्रचार करण्यात येणार आहे. याच प्रचार रिक्षांचा आज मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची उद्या सभा होतेय. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवला आहे. तसेच ते भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.
दरम्यान, आज राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे जाताना रस्त्यात ठिक-ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं. अहमदनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक जमले होते. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
महत्वाच्या बातम्या